अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. पण आता यावरून ‘राजकारण’ही सुरु झालेय.होय, यानिमित्ताने काँग्रेसने भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.
‘नशीब की, सोनू सूद महाराष्ट्रात चांगले काम करून हजारो युपीच्या लोकांना मदत करतोय. युपीत असता तर युपी सरकारने आधी बसगाड्यांना स्कूटर म्हटले असते, मग मजूरांच्या फिटनेसच्या नावावर या कामात खोडा घातला असता आणि नंतर सोनू सूदला जेलमध्ये डांबले असते. योगी सरकार चांगले काम करणा-यांना तुरुंगात पाठवते,’असे ट्विट युपी काँग्रेसने केले आहे.तूर्तास युपी काँग्रेसच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
म्हणे पब्लिसिटी स्टंटसोनू सूदने आत्तापर्यंत हजारो स्थलांतरीत मजूरांना मदतीचा हात दिला आहे. त्याच्या या कामाची जोरदार प्रशंसा होत आहे. अर्थात काहींनी त्याच्या या कामावर टीका करत हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोपही केला आहे. आता हा आरोप करणा-यांना सोनूने परखड उत्तर दिले आहे. आजतकशी बोलताना सोनूने या आरोपांवर उत्तर दिले. ‘मला कुठल्याही पब्लिसिटीची गरज नाही. मी मदत करतोय ते मजूरांची. ज्यांच्या हाताला सध्या काम नाही. आई-वडील लहान लहान मुलांना घेऊन शेकडो किमी पायपीट करत निघाले आहेत. त्यांच्या वेदना त्यांनाच ठाऊक. या वेदना मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. मी कोणत्याही मीडिया पर्सनला बोलावले नाही. तुम्ही मजूरांची बस रवाना करा, तेव्हा आम्हाला बोलवा, असे अनेक मीडिया पर्सनचे मॅसेज मला येतात. पण मी अशा कुठल्याही प्रसिद्धीच्या फंदात पडलेलो नाही. घरी जाण्यासाठी रोज शेकडो कॉल व मॅसेज येत आहेत. मी एकटा हे सांभाळू शकत नाही. त्यामुळे मी एक टीम तयार केलीय, ती सगळे काम बघत आहे,’ असे सोनूने सांगितले.