कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सोदूने हजारो लोकांना मदतीचा हात दिला. लॉकडाऊन काळात हजारो स्थलांतरित मजुरांना त्याने त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवले. लोकांच्या नजरेत ‘देवदूत’ठरलेला सोनू आजही लोकांना भरभरून मदत करतोय. आता तर मजुरांच्या मदतीपासून सुरु झालेल्या त्याच्या या प्रवासाने व्यापक रूप घेतले आहे. आता स्थलांतरित मजुरांना त्यांचे हक्काचे घर देण्याची तयारी सोनू सूदने सुरु केली आहे. तब्बल 20 हजार मजुरांसाठी त्याने नोएडामध्ये घर ऑफर केले आहे.सोनूने ट्वीट करून ही माहिती दिली. ‘ 20 हजार स्थलांतरित मजुरांना मी आता घर ऑफर करत आहे. ज्या मजुरांना नोएडामध्ये काम मिळाले आहे, त्यांना मी घर देऊ इच्छित आहे. नॅशनल असोसिएशन फॉर एलिव्हेशन कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष ललित ठकुराल यांच्या मदतीने हे शक्य होणार आहे,’ असे ट्वीट सोनूने केले आहे.
रिअल लाइफमध्ये हिरो ठरलेला सोनू शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत करतो आहे. सोनूला रोज मदतीसाठी कितीतरी लोक वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करतात. पण रोज नेमके किती लोक त्याच्याकडे मदत मागतात याचा खुलासा आतापर्यंत करण्यात आला नव्हता. काही दिवसांपूर्वीच याची नेमकी आकडेवारी सोनूने ट्विटरवर शेअर केली होती. ही आकडेवारी पाहून लोक अवाक झाले होते.
1137 मेल, 19000 फेसबुक मेसेज, 4812 इन्स्टा मेसेज आणि 6741 ट्विटर मेसेज. हे आजचे मदतीचे मेसेज. सरासरी आकडेवारी पाहिली तर साधारण रोज इतके मदतीचे मेसेज येतात. एक माणूस म्हणून या सर्वांपर्यंत पोहोचणेशक्य होत नाही. पण तरी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो, असे एक ट्वीट अलीकडे त्याने केले होते.इतकेच नाही तर माझ्याकडून तुमचा मेसेज मिस झाला असेल तर मला माफ करा, असेही लिहिले होते. सोनूने लॉकडाऊनपासून हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले. त्यानंतर त्याच्याकडे वेगवेगळी मदत लोकांनी मागितली. अनेकांना त्याने पुस्तके दिली, अनेकांची फी भरली. अनेकांना रोजगार देतो आहे. त्यासाठी त्याने एक अॅपही सुरू केले आहे.