अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.
सोनू सध्या गुगल ट्रेंडमध्ये देखील आघाडीवर असून त्याने आजच्या आघाडीच्या सगळ्या कलाकारांना गुगलवर मात दिली आहे. बॉलिवूडवर आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तीन खानांचे राज्य असल्याचे म्हटले जाते. पण गुगल ट्रे्ंडवर सध्या सोनू सूदची चलती आहे. त्याच्याआधी गुगल ट्रेंडमध्ये अक्षय कुमार अव्वल होता. पण त्याने अक्षयला देखील मागे टाकले आहे. केवळ मुंबई, दिल्ली सारख्या शहरातच नव्हे तर छोट्या छोट्या शहरातील लोकदेखील सोनूविषयी गुगलवर सर्च करत आहेत.
सोनूचे मुळ गाव काय आहे, त्याने आतापर्यंत कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्याने दिलेला टोल फ्री नंबर, तो लोकांना करत असलेली मदत अशा विविध गोष्टी लोक सध्या गुगलवर सर्च करत आहेत. त्यामुळे सध्या गुगलवर सोनू सूदचाच बोलबाला आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.
सोनू आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवणार याची अनेक मजूरांना खात्री असल्याने ते मेसेज करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूकडून मदत मागत आहेत. सोनू दिवसाला हजारोहून अधिक मजूरांना घरी पाठवत आहे. त्यामुळे सध्या सोनू सूदच्या नावाचीच सगळीकडे चर्चा होत आहे.