‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटावरून अभिनेता सोनू सूद आणि कंगना राणौत यांच्या वाजलेय. दिग्दर्शक क्रिश यांनी नव्या चित्रपटाचा बहाणा करत, या चित्रपटातून काढता पाय घेतला. पाठोपाठ सोनू सूद यानेही चित्रपटाला रामराम ठोकला. या सगळ्यामागे कंगना राणौत असल्याचे सांगितले गेले. कंगनाच्या उर्मट वागणुकीला कंटाळून सोनू सूदने हा चित्रपट सोडल्याची चर्चाही रंगली. होय, कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनात ढवळाढवळ केल्याने क्रिश आणि सोनूने चित्रपट सोडल्याचे मानले गेले. अर्थातचं नेहमीप्रमाणे कंगनाने यावर मोठ्ठा खुलासा केला. एका महिला दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करावे लागणार असल्याने सोनू सूदचा पुरुषी अहंकार दुखावला अन् त्याने हा चित्रपट सोडल्याची जळजळीत टीका कंगनाने केली. कंगनाच्या या आरोपाला सोनू सूदने सुरूवातीला अतिशय संयमी उत्तर दिले.दिग्दर्शक स्त्री आहे की पुरुष हे पाहून सिनेमा सोडलेला नाही. असे असते तर मी फराह खानच्या हाताखाली काम केले नसते, असे सोनू सूद म्हणाला. पण कंगनाचे आरोप चालून आहेत म्हटल्यावर त्याचीही सटकली. मग त्यानेही कंगनावर थेट हल्ला चढवला.सगळ्या गोष्टीला ‘पुरुषी अहंकार’ हे एकच लेबल लावणे मूर्खपणाचे लक्षण आहे. नेहमी पीडित कार्ड आणि महिला कार्ड खेळणे गरजेचे नाही, असे सोनू सूद म्हणाला. आता हा टोमणा कंगनाला किती झोंबतो, ते बघूच.
'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. कंगना राणावत ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.