Join us

मुंबईत दोन तास वीज नव्हती तर...!  सोनू सूदने केली ‘लाखमोला’ची बात

By रूपाली मुधोळकर | Published: October 12, 2020 6:15 PM

अभिनेता सोनू सूद यानेही मुंबईच्या ‘बत्ती गुल’वर प्रतिक्रिया दिली. पण...

ठळक मुद्देदिग्दर्शक अशोक पंडित यांनीही ''महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पॉवरलेस झाल्याची टीका केली.

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई काही तासांसाठी ठप्प झाली. अचानक बत्ती गुल झाल्याने अख्खी मुंबई जागच्या जागी थांबली.  सकाळी सव्वा दहाच्या सुमारास  पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन तासांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत झाला खरा, पण यादरम्यान मुंबईच्या ‘बत्ती गुल’वरच्या असंख्य प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. एकीकडे कंगना राणौत, अनुपम खेर यासारख्या सेलिब्रिटींनी यानिमित्ताने सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. एकंदर काय तर दोन तास मुंबईत वीज नव्हती ही बातमी ट्रेंड झाली, काहीच मिनिटात अख्ख्या जगाला कळली. अभिनेता सोनू सूद यानेही मुंबईच्या ‘बत्ती गुल’वर प्रतिक्रिया दिली. पण त्याने अगदी डोळ्यांत अंजन घालणारी, लाखमोलाची गोष्ट केली.

‘मुंबईत दोन तास वीजपुरवठा खंडीत झाल्यावर अख्ख्या देशाला कळले. पण आजही देशात अशी अनेक घरे आहेत, ज्यांना दोन तासही वीज मिळत नाही. त्यामुळे कृपया संयम बाळगा...,’असे ट्विट सोनू सूदने केले.त्याचे हे ट्विट मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याची बातमी व्हायरल झाली, त्याचे वेगाने व्हायरल झाले. हजारो लोकांनी ते लाईक केले.

 कंगनाचे पुन्हा टीकास्त्र

कंगना राणौत मुंबईतील समस्यांवर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची आणि सरकारवर टीका करायची एकही संधी सोडत नाही. रविवारी कंगनाने आरेमधील मेट्रो कारशेड दुसरीकडे हलविण्याच्या निर्णयावर टीका केली होती. त्यानंतर, आज सकाळी मुंबईत झालेल्या अंधारावरुनही कंगनाने बीएमसी आणि राज्य सरकारला लक्ष्य केले. कंगनासह दिग्दर्शक अशोक पंडित, कुणाल खेमू यांनीही चिमटा काढला. कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांचा फोटो शेअर केला. मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार क..क..क.... कंगना करण्यात व्यस्त आहे, असे ट्विट कंगनाने केले.

दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही ''महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पॉवरलेस झाल्याची टीका केली. यासाठी ते आता रिपब्लिक आणि अर्नब गोस्वामीला दोष देणार नाही अशी अपेक्षा. मुंबईच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे कधीच वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. हे ग्रीड फेल्युअर म्हणजे सरकार प्रशासनामध्ये अपयशी ठरत असल्याचे हे उदाहरण आहे," असे पंडित यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन म्हटले.

टॅग्स :सोनू सूद