गेल्या काही महिन्यात डीपफेक व्हिडिओची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या व्हिडिओनंतर अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर आता सोनू सूदही डीपफेकटा शिकार झाला आहे. सोनू सूदचा चेहरा वापरून डीपफेक व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अभिनेताही चिंतेत पडला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सोनू सूदने चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
सोनू सूदने त्याच्या X अकाऊंटवरुन ट्वीट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सोनू सूद कुटुंबाला पैशाची मदत करण्याचं आवाहन करताना दिसत आहे. पण. व्हिडिओत दिसणारी ही व्यक्ती सोनू सूद नसून दुसरीच कोणीतरी आहे. सोनू सूदचा चेहरा वापरून हा डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. सोनू सूदच्या फाऊंडेशनद्वारे समोरच्या व्यक्तीला आईच्या ऑपरेशनसाठी पैशाची मदत करण्यात येईल, असं व्हिडिओत ती व्यक्ती म्हणत आहे. हा व्हिडिओ पाहून सोनू सूदलाही धक्का बसला आहे.
सोनू सूदने हा व्हिडिओ खोटा असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. तसंच अशा फ्रॉडपासून सावध राहण्याचा इशाराही त्याने दिला आहे. "डिपफेक व्हिडिओ आणि फेक लोन अॅप्समुळे घडलेल्या खऱ्या आयुष्यातील प्रसंगावर माझा सिनेमा फतेह प्रेरित आहे. हा नुकताच घडलेला प्रसंग आहे. जिथे कोणीतरी या गरजू कुटुंबाकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ कॉलवरुन त्यांच्याशी संवाद साधत सोनू सूद असल्याचं भासवत आहे. अनेक जणांना यामध्ये फसवलं गेलं आहे. अशा कॉलपासून सावध राहा," असं सोनू सूदने म्हटलं आहे.
दरम्यान, सोनू सूदने आत्तापर्यंत अनेक गरजूंची मदत केली आहे. करोना काळातही तो अनेकांसाठी देवदूत ठरला होता. त्यानंतर त्याने सोनू सूद फाऊंडेशन सुरू केली. यामधून तो अनेकांना मदत करतो.