Join us

शूज चोरणाऱ्या डिलीव्हरी बॉयची सोनू सूदने घेतली बाजू; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 14:03 IST

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नामांकित कंपनीचा डिलिव्हरी बॉय हा फ्लॅटच्या बाहेर ठेवलेले शूज चोरताना पाहायला मिळतोय. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली. ज्यामुळे डिलिव्हरी बॉयचं पितळ उघडं पडलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यातच आता या घटनेवर अभिनेता सोनू सूदनेही आपलं मत मांडलं आहे. 

सोनू सूदने पोस्ट शेअर करत डिलिव्हरी बॉयची बाजू घेत त्याच्यावर कारवाई न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानं लिहलं, 'एखाद्याच्या घरी अन्न पोहोचवताना स्विगीच्या डिलिव्हरी बॉयनं शूज चोरले असतील, तर त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका. खरं तर त्याला नवीन शूज खरेदी करून द्या. कदाचित त्याला  खरोखरच गरज असेल. दयाळूपणा दाखवा'. सोनू सूदच्या या मताशी काही नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे. तर काहींनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

तर ९ एप्रिल रोजी गुरुग्रामच्या एका सोसायटीमध्ये नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयनं दाराबाहेर असलेले शूज चोरले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रोहित अरोरा नावाच्या एका 'एक्स' यूजरने शेअर केला आहे. चोरी केलेले शूज नायकीचे असल्याचा दावाही अरोरा यांनी यावेळी केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओमध्ये दिसते की, डिलिव्हरी बॉय हा ज्या ठिकाणी ऑर्डर पोहचवायची आहे, त्या फ्लॅटच्या दरवाजापर्यंत जातो. तिथे गेल्यानंतर तो दरवाजाची बेल वाजवतो. जोपर्यंत दरवाजा उघडला जात नाही तोवर तो डिलिव्हरी आजुबाजूला कोण आहे का ते पाहतो. काही वेळानंतर फ्लॅटमध्ये असलेली महिला दरवाजा उघडते आणि आपली ऑर्डर घेते. त्यानंतर पार्सल दिल्यानंतर तो बिल्डिंगचा जिना उतरताना दिसतोय. अचानक आपल्या डोक्याला बांधलेला कपडा काढून तो पुन्हा माघारी फिरतो. ज्या ठिकाणी त्याने पार्सल पोहचवलं. तिथे जाऊन तो आपल्या रुमालामध्ये फ्लॅटच्या समोर असलेले काळ्या रंगाचे शूज लपवतो. त्यानंतर तो तिथून पळ काढताना दिसतोय.

टॅग्स :सोनू सूदसेलिब्रिटीबॉलिवूडस्विगी