कोरोना काळात हजारो स्थलांतरित मजुरांसाठी दिवसरात्र खपणारा अभिनेता सोनू सूद अद्यापही थकलेला नाही. गेल्या 8 महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय की लोक लहानमोठ्या समस्या, अडचणी त्याला सांगत आहेत. अमनजीत सिंग यापैकीच एक. आयुष्याची तब्बल 12 वर्षे वेदना झेलणाऱ्या अमनजीतने आता सोनूकडे मदतीची याचना केली आहे.
अमनजीतने अलीकडे एक व्हिडीओ शेअर करत त्यात सोनू सूदला टॅग केले. मी गेल्या 12 वर्षांपासून सर्व्हाइकलच्या त्रासाने बेजार आहे. आता फक्त तूच एक आशेचा किरण आहे. माझे वडील ऑटो चालवतात. 12 वर्षांत त्यांनी शक्य ते सगळे काही माझ्यासाठी केले. पण आता ते असमर्थ आहेत. आयुष्याची 12 वर्षे वेदना सहन करण्यात गेली. कोव्हिडमुळे नातेवाईकांनी पाठ फिरवली. प्लीज माझी मदत कर. मार्चमध्ये माझे ऑपरेशन होणार होते. पण आत्तापर्यत झालेले नाही, असे अमनजीत सिंग या व्हिडीओत म्हणतोय.
12साल की तकलीफ समझो खत्म
अमनजीतचा हा व्हिडीओ पाहून सोनू सूदने त्वरित त्याला उत्तर दिले. ‘12साल की तकलीफ समझो खत्म. आप 20 तारीख को ट्रव्हल करेंगे, 24 तारीख को अपनी सर्जरी होगी,’ असे सोनूने अमनजीतला मदतीचे आश्वासन दिले.
नेहाच्या लग्नासाठी बिहारला जाणार सोनू सूद
सोनू एका ट्विटच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात आनंद भरतो. असाच काहीसा आनंद बिहारच्या आरामध्ये राहणाऱ्या नेहा सहायला मिळाला आहे. नेहाने तिच्या लग्नाची पत्रिका सोनूला ट्विट केली आणि त्याला लग्नाला येण्याचे आमंत्रण दिले होते. सोनूने हे आमंत्रण स्वीकारले असून लग्नाला येणार असल्याचे सांगितले आहे.
नेहाच्या लग्नाच्या पत्रिकेवर रिप्लाय करत सोनूने लिहिले की, 'चला बिहारचं लग्न बघुया'. नेहा मुळची आराच्या नवादा पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. तिचे लग्न ११ डिसेंबरला होणार आहे. नेहाने तिच्या लग्नाचे कार्ड ट्विट करत लिहिले होते की, सोनू सर, हे तुमच्यासाठी. मी ठरवले होते की, देवानंतर पहिली पत्रिका तुम्हाला देणार. तुमच्यामुळे माझी बहीण ठीक आहे आणि संपूर्ण परिवारही. तिच्या या भावनिक पोस्ट ला रिप्लाय करत सोनूने लग्नाला येण्यास होकार दिला आहे.