लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी सरसावलेला अभिनेता सोनू सूद याच्यामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. नुकतीच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोनू सूदने चालवलेल्या कार्यवर शंका उपस्थित केली होती. सोनू सूद मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप त्यांनी केला होता. अशात आता एक वेगळीच गोष्ट समोर येतेय. होय, सोनूकडे मदत मागणारे अनेक ट्वीट अचानक डिलीट केले जात असल्याचे आढळून आले आहे. खुद्द सोनू सूद यानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.तुम्हाला आठवत असेलच की, ट्विटरवरच्या सोनूकडे मदत मागणा-या अनेक ट्विटची चर्चा रंगली होती. मदतीचे हे ट्विट आणि यावर सोनूने दिलेली काही भन्नाट उत्तरांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आता मात्र सोनूने ज्या लोकांना रिप्लाय केला, अशी अनेक ट्विट ट्विटरवरून डिलीट झाली असल्याचा दावा एक माजी पत्रकार दिलीप मंडल यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, यावरून हे फक्त ट्विटर आयडी होते का? किंवा त्याच्या मागे खरंच कोणी व्यक्ती होते की नाही असा संभ्रम निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सोनू सूदकडे मदत मागणा-यांपैकी अनेकांनी आपल्या फोटोंसह ट्विट केले होते. मात्र अनेकांनी केवळ ट्विटच्या माध्यमातून मदत मागितली होती आणि सोनूने त्यांना मदतही केली होती. मात्र अचानक यापैकी अनेक ट्विट डिलीट होत असल्याने असे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.तूर्तास यामागे काय कारण आहे, हे तर ठाऊक नाही. पण सोनू सूदने यावर चिंता व्यक्त केली आहे. कारण त्याच्याही नजरेत असे काही ट्वीट आले आहेत. जे केवळ ट्वीट करण्याच्या उद्देशाने केले गेले होते.
याबाबत सोनू सूदने एक ट्वीट केले आहे. ‘कृपया ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांनीच ट्वीट करा. अनेक लोक ट्वीट करून मग ते डिलिट करत असल्याचे मला आढळून आले आहे. ज्यामुळे आमच्या कामाबद्दल संभ्रम निर्माण होतो आहे. याशिवाय यामुळे अनेक गरजवंतापर्यंत पोहोचताना त्रास होत आहे. विश्वासाच्या या नात्यात बाधा आणण्याचे काम कृपया कोणी करू नये, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.