पंजाब विधानसभा निवडणुकीचे (Punjab assembly elections) बिगुल येत्या काही दिवसात वाजणार असून सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात ज्याची सर्वाधिक चर्चा झाली त्या सोनू सूदच्याही (Sonu Sood) घरातील एका व्यक्तीने आता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द सोनू सूदनेच याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनू सूदच्या घरातून राजकारणात एन्ट्री करणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची बहीण आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चर (Malvika Sood ) ही येत्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहे. दरम्यान, सोनू सूदने आपली बहीण निवडणूक लढवणार हे जरी पत्रकार परिषदेत सांगितलं असलं तरी कोणत्या पक्षाच्या चिन्हावर ती निवडणूक लढणार हे मात्र, त्याने गुलदस्त्यात ठेवलं आहे.
काही दिवसांपूर्वी मालविका आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मालविकासोबत सोनू सूददेखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोनू सूद हा काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नाही तर तो आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारही असू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, सोनू सूदने स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याविषयी कोणतंही भाष्य केलं नसलं तरीदेखील त्याची बहीण राजकारणात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ‘पंजाब लोक काँग्रेस’या नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे मालविका आता त्यांच्या पक्षातून निवडणूक लढणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.