Join us

Sonu Sood Wife Accident: सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:51 IST

Sonali Sood Car Accident: अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूद हिचा मुंबई-नागपूर महामार्गावर अपघात झाला आहे.

Sonu Sood's Wife Car Accident:  बॉलिवूडचा दिलदार, दयावान आणि गरीबांचा मसिहा म्हणून ओळखला जाणाऱ्या सोनू सूदसंदर्भात (Sonu Sood) मोठी बातमी समोर आली आहे. सोनू सूदची पत्नी सोनाली सूद (वय ५४) हिचा अपघात झाला आहे.  मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती आहे. सोनालीसोबतच तिची बहिण सुमिता साळवे (वय ५५) आणि पुतण्यादेखील जखमी झाले आहेत. तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सोनू सूदला अपघाताविषयी कळताच तो तातडीने नागपूर रुग्णालयात पोहोचला असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली सूद, तिची बहिण आणि पुतण्या हे कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांच्या गाडीने ट्रकला धडक दिली. सोनेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धा उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून नागपूरमधील मॅक्स रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर सोनालीचा पुतण्या किरकोळ जखमी झाला होता, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. अभिजीत भातकुलकर यांनी दिली आहे.  सोनालीचा पुतण्या गाडी चालवत होता.  कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. 

सोनाली सूद ही लाईमलाईटपासून दूर राहते. सोनू सूदने १९९६ मध्ये सोनालीशी लग्न केलं होतं. ती एक मूळची आंध्र प्रदेशची आहे. या जोडप्याला अयान आणि इशांत अशी दोन मुले आहेत.  सोनालीने नागपूर विद्यापीठातून एमबीए केले आहे. ती व्यवसायाने एक प्रसिद्ध चित्रपट निर्मातीही आहे. 

टॅग्स :सोनू सूदसेलिब्रिटीबॉलिवूडनागपूरसमृद्धी महामार्गमहामार्गअपघात