सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) बॉलिवूडमध्ये कौटुंबिक सिनेमांसाठी ओळखले जातात. ९० च्या दशकात 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'विवाह' यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. त्यांनीच सलमान खान (Salman Khan) 'प्रेम' नावाने ओळख मिळवून दिली. दरम्यान विवाह या सिनेमात सूरज बडजात्या यांनी सलमानला वगळून शाहीदची निवड का केली याचा खुलासा केला.
डिजिटल कमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत सूरज बडजात्या म्हणाले, "विवाह सिनेमात मी कोणतीही तडजोड करणार नाही हे मी आधीच ठरवलं होतं. तेव्हा 'मै प्रेम की दिवानी हूँ' सिनेमा अपयशी झाला होता. म्हणूनच विवाहच्या बाबतीत मला रिस्क घ्यायची नव्हती. सलमानने तेव्हाच मला एकत्र काहीतरी करु असं विचारलं होतं. पण त्यावेळी माझ्याकडे सलमानसाठी कोणतीही स्क्रिप्ट नव्हती. विवाहचीच स्क्रीप्ट होती जी मला माझ्या वडिलांनी दिली होती."
ते पुढे म्हणाले, "सलमान विवाह साठी योग्य नव्हता. कारण मला सिनेमात तरुण चेहरा हवा होता. जेव्हा मी विवाह बनवायचा विचार केला तेव्हा मला ही गोष्ट चांगलीच माहित होती. सलमान मोठा स्टार होता आणि मला हिरोमध्ये थोडी निरागसता हवी होती. तसंत वयानेही तो कमी हवा होता. यानंतर आम्ही शाहिद आणि अमृताला कास्ट केलं." सलमान खान सूरज बडजात्या यांच्या 'प्रेम रतन धन पायो' मध्ये शेवटचा दिसला. यामध्ये सलमानचा डबल रोल होता.