जिया खान आणि सुरज पांचोली यांचे एकेकाळी अफेअर होते. त्यांच्यात सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांच्यात खटके उडायला लागले आणि त्यानंतर काहीच महिन्यात जिया खानने आत्महत्या केली. जिया खानचे आत्महत्या प्रकरण त्याकाळी मीडियात चांगलेच गाजले होते. सुरजने जियाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा आरोप त्याच्यावर लावून त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. या प्रकरणाबाबत काहीही न बोलणेच सुरजने अनेक वर्षं पसंत केले होते. पण पिंकव्हिलाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जियाच्या निधनानंतर त्याची अवस्था कशी झाली होती याविषयी सांगितले आहे.
जियाच्या निधनानंतर काहीच दिवसांत सुरजला अटक करण्यात आले होते. या सगळ्या परिस्थितीत त्याची अवस्था कशी होती याविषयी सुरजने या मुलाखतीत सांगितले की, मला ऑर्थर रोड मधील अंडा सेल मध्ये ठेवण्यात आले होते. या सेलमध्ये असताना तुमचा कोणाशीच कोणत्याही प्रकारचा संपर्क नसतो. तुम्हाला वर्तमानपत्र देखील वाचायला दिले जात नाही. या सगळ्या परिस्थितीत मी खूपच शांत झालो होतो. मी माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीवर प्रेम केले, ती व्यक्ती माझ्यापासून दूरावली होती. त्यामुळे मला या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नव्हता. मी जियाच्या कुटुंबियांचा खूपच सन्मान करतो. त्यामुळे याबाबत मी काहीही न बोलणेच पसंत केले होते. तिचे कुटुंब कोणत्या दुःखातून जात आहे हे मला कळत होते. पण या सगळ्यात मीडियाला केवळ टिआरपीमध्ये रस होता. त्यामुळे माझी सकारात्मक स्टोरी त्यांनी त्यावेळी लिहिली नाही.
जियाच्या निधनानंतर तिच्या घरात एक पत्र मिळाले होते. या पत्रात तिने लिहिले होते की, मी माझे आयुष्य, माझे भविष्य तुझ्यासोबत पाहात आहे. पण तू माझी स्वप्नं उद्धवस्त केली आहेत.
जियाच्या निधनानंतर 2013 मध्ये जियाची आई रबिया खान यांनी त्यांची मुलगी जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे असा संशय व्यक्त केला होता. तसेच तिच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.