Join us

सूर्यवंशममधील या अभिनेत्रीचे झाले होते अपघाती निधन, निधनाच्यावेळी ती होती केवळ ३१ वर्षांची

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 7:20 PM

सूर्यवंशम या चित्रपटात अमिताभ बच्चन, सौंदर्या, जयासुधा, कादर खान, अनुपम खेर, मुकेश ऋषी, बिंदू यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ठळक मुद्देसौंदर्या १७ एप्रिलला भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देसम पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी करिमनगर येथे एअरक्राफ्टने जात होती. एअरक्राफ्टने उड्डाण केल्यानंतर १०० फूट वरती जाताच तिचे एअरक्राफ्ट क्रॅश झाले होते. त्या दुर्घटनेत तिचे निधन झाले.

सूर्यवंशम हा चित्रपट २१ मे १९९९ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला नुकतेच २० वर्षं पूर्ण झाले असून या चित्रपटात अमिताभ बच्चन, सौंदर्या, जयासुधा, कादर खान, अनुपम खेर, मुकेश ऋषी, बिंदू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात अमिताभ मुलगा आणि वडील या दुहेरी भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन करता आले नव्हते. पण सोनी मॅक्सवर हा चित्रपट अनेकवेळा दाखवण्यात आल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडता चित्रपट बनला.  

कुटुंबव्यवस्था आणि नातेसंबंधांवर भर देणारा, विविध भावभावनांची सरमिसळ असलेला हा सिनेमा तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवुडमधील पदार्पणाचा सिनेमा होता. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला आणि एकमेव हिंदी सिनेमा आहे. तसेच या चित्रपटातील दोन्ही नायिका या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, सौंदर्या, जयासुधा, कादर खान, अनुपम खेर, मुकेश ऋषी, बिंदू यांच्या मुख्य भूमिका होत्या. सौंदर्याने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. सौंदर्याने सूर्यवंशम या केवळ एकच हिंदी चित्रपटात काम केले असले तरी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले होते.

सौंदर्या दक्षिणेतील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. सूर्यवंशम या चित्रपटात हिरा या व्यक्तिरेखेच्या नायिकेच्या भूमिकेत सौंदर्याला प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. तिचा अभिनय, तिचे सौंदर्य याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. सौंदर्याला हिंदी येत नसल्याने तिच्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी डबिंग केले होते. या चित्रपटानंतर सौंदर्या कोणत्या बॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार अशी तिच्या फॅन्सना उत्सुकता लागली होती. पण या चित्रपटाच्या केवळ पाच वर्षांनंतर सौंदर्याचे निधन झाले. सौंदर्या १७ एप्रिलला भारतीय जनता पार्टी आणि तेलुगू देसम पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी करिमनगर येथे एअरक्राफ्टने जात होती. फोर सीटर प्रायवेट एअरक्राफ्टने बंगळुरूच्या जक्कुर एअरफिल्ड येथून तिच्या एअरक्राफ्टने उड्डाण केल्यानंतर १०० फूट वरती जाताच तिचे एअरक्राफ्ट क्रॅश झाले होते. एअरक्राफ्टमध्ये सौंदर्यासोबतच तिचा भाऊ अमरनाथ, हिंदू जागरण समितीचे सेक्रेटरी रमेश कदम आणि पायलट जॉय फिलिप होते. त्या दुर्घटनेत या चौघांचाही मृत्यू झाला होती. त्यावेळी सौंदर्या केवळ ३१ वर्षांची होती. हा अपघात इतका भीषण होता की, तिच्या घरच्यांना तिचे शव देखील मिळाले नव्हते. मृत्यूच्या केवळ वर्षभराअगोदर सौंदर्याने सॉफ्टवेअर इंजिनीअर जी. एस. रघूसोबत प्रेमविवाह केला होता. सौंदर्याचा अपघात झाला त्यावेळी ती गर्भवती होती. १८ जुलै १९७२ ला जन्मलेल्या सौंदर्याने १९९२ साली तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिचे वडील एस. नारायण हे एक बिझनेसमन आणि कन्नड चित्रपटांचे लेखक होते.

टॅग्स :सूर्यवंशीअमिताभ बच्चन