दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांना कोरोनाची (korona virus) लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच कमल हासन विदेश दौऱ्यावरुन देशात परतले होते. यावेळी किरकोळ खोकला झाल्यामुळे त्यांनी कोविड टेस्ट केली. ज्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. कमल हासन सध्या आयसोलेशनमध्ये असून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
"युएस दौऱ्यावरुन परत आल्यावर मला थोडासा खोकला झाला होता. त्यामुळे मी तपासणी केली आणि मला कोरोना झाल्याचं समोर आलं. मी आयसोलेशनमध्ये आहे. पण, अजूनही कोरोना महामारी संपली नाही हे माझ्या लक्षात आलंय. तुम्ही सगळे सुरक्षित राहा आणि काळजी घ्या", असं ट्विट कमल हासन यांनी केलं आहे.
दरम्यान, कमल हासन यांची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसंच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. कमल हासन हे दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. १९६० मध्ये त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली असून अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'Varumayin Niram Sivappu', 'Saagar', 'Vishwaroopam', 'चाची 420', 'इंडियन' अशा अनेक तेलुगू, तामिळ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.