कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात सर्व लोक आपआपल्या घरात कैद आहेत. पण अशातही अनेकजण केवळ आपल्या मौजमजेसाठी लॉकडाऊनचे उल्लंघन करताना दिसत आहेत. साऊथच्या एका बड्या अभिनेत्रीचे असेच एक प्रकरण समोर आले आहे. ही अभिनेत्री मध्यरात्रीनंतर मित्रासोबत लक्झरी कारमध्ये बाहेर पडली आणि अपघातात जखमी झाली.
तामिळ, तेलगू व कन्नड चित्रपटांची दिग्गज अभिनेत्री शर्मिला मांद्रे बेंगळुरुमध्ये एका अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिचा मित्र लोकेश वसंत हाही तिच्यासोबत होता. शर्मिलावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरु आहे.रात्री पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. लॉकडाऊनच्या काळात शर्मिला आपल्या मित्रासोबत बाहेर भटकायला बाहेर पडली. याचदरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला.
शर्मिलाकडे कुठलाही लॉकडाऊनचा पास नव्हता. त्यामुळे इतक्या रात्री शर्मिला घराबाहेर का पडली, याचा तपास पोलिसा करत आहेत. तिची व तिच्या मित्राची स्थिती नाजूक असल्याने अद्याप पोलिसांनी दोघांचाही जबाब नोंदवलेला नाही.शर्मिलाची गाडी अंडरब्रिजवर एका पिलरला धडकली आणि हा अपघात झाला. पोलिसांना अपघातग्रस्त कार आढळून आली. पण कारमध्ये कुणीही नव्हते. यानंतर पोलिसांनी जवळच्या रूग्णालयात चौकशी केली असताना ही कार अभिनेत्री शर्मिलाची असल्याचे शिवाय ती रूग्णालयात भरती असल्याचे कळले.
शर्मिला ही साऊथची मोठी अभिनेत्री आहे. साऊथच्या अनेक सिनेमांत तिने काम केले आहे. बिग बॉस कन्नडमध्येही स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. ‘सजनी’ या सिनेमातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर अनेक हिट सिनेमात ती झळकली. अनेक चित्रपटांची निर्मितीही तिने केली आहे.