Join us

Prakash Raj, Uddhav Thackeray :  चाणक्य आज लाडू खात असले तरी..., अभिनेते प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 10:22 AM

Prakash Raj, Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना पाठींबा दिला. साऊथचे सुपरस्टार प्रकाश राज त्यापैकीच एक.

Prakash Raj, Uddhav Thackeray : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसांपासून  महाराष्ट्र राजकीय घडामोडीचं केंद्र झालं होतं. सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. काल अखेर सगळं चित्र स्पष्ट झालं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा  दिला आणि राज्यात नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. विधानसभेतील शक्तिपरीक्षा टाळत उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचं जाहिर केलं. अतिशय भावुक भाषण करत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आणि पाठोपाठ राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना पाठींबा दिला. साऊथचे सुपरस्टार प्रकाश राज (Prakash Raj ) त्यापैकीच एक. त्यांनी  ट्विटरवर एक पोस्ट लिहित उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. शिवाय अप्रत्यक्षपणे भाजपाला लक्ष्य केलं.आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे प्रकाश राज यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे.

काय आहे प्रकाश राज यांची पोस्ट?‘उद्धव ठाकरे, तुम्ही खूप छान काम केलेत सर!  मला खात्री आहे की, तुम्ही ज्या पद्धतीने राज्य सांभाळलं, त्यासाठी महाराष्ट्रातील जनता नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील..चाणक्य आज लाडू खात असले तरी तुमचा सच्चेपणा अधिक काळ टिकून राहील.. तुम्हाला आणखी बळ मिळो,’ असं प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 काय म्हणाले उद्धव ठाकरे...सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काल रात्री 9.30 च्या सुमारास फेसबुक लाईव्हवर येत जनतेला संबोधित केलं.  ‘शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे. मला पदाचा लोभ नाही. मला खेळ खेळायचाच नाही, असं म्हणत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. उद्यापासून मी पुन्हा शिवसेनेच्या भवनात बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असं म्हणत त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.  

 

टॅग्स :प्रकाश राजउद्धव ठाकरेमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष