साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ (Liger ) हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. देशात वेगवेगळ्या ठिकाणी दोघंही धडाक्यात प्रमोशन करत आहेत आणि प्रत्येक इव्हेंटनंतर विजयच्या सिंपल लुकची चर्चा रंगलीये. विशेषत: त्याच्या पायातील स्लीपर लक्ष वेधून घेत आहेत.
‘लाइगर’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अनन्या पांडे स्टायलिश लुकमध्ये दिसली. याऊलट विजय देवरकोंडा एक साधी टी-शर्ट आणि पायात स्लीपर घालून आला. एवढ्या मोठ्या इव्हेंटला विजय देवरकोंडा 199 रूपयांची स्लीपर घालून येतो म्हणजे काय? त्याचीच चर्चा झाली. सगळे जण हैराण झालेत.
यानंतरच्या ‘लाइगर’च्या प्रत्येक इव्हेंटमध्ये विजय देवरकोंडा अशाच लुकमध्ये दिसतोय. त्याचे कपडे बदलले पण पायातील चप्पल बदलली नाही. एवढा मोठा स्टार अशी चप्पल घालून का फिरतोय? साहजिकच हा प्रश्न अनेकांना पडला. तर त्यामागे एक कारण आहे. होय, विजय देवरकोंडाच्या या डाऊन टू अर्थ लुकमागच्या कारणांचा खुलासा झाला आहे. खुद्द विजयच्या फॅशन स्टायलिस्टने हा खुलासा केला आहे.
काय म्हणाला स्टायलिस्ट?विजय देवरकोंडाचा स्टायलिस्ट हरमानने यामागची अख्खी स्टोरी सांगितली. तो म्हणाला, ‘लाइगर’च्या ट्रेलर लॉन्चच्या दिवशी विजय देवरकोंडाचा लुक क्लासी असणार, म्हणून मी तयारी केली होती. मी त्याला एकदम क्लासी, स्टायलिश लुक देणार होतो. पण अचानक विजयने मला बोलवलं. माझा लुक एकदम सिंपल असेल, चित्रपटात माझं कॅरेक्टर आहे, त्यानुसार माझा लुक असायला हवा, असं तो म्हणाला. एक सिंपल टी-शर्ट, ट्राऊजर आणि चप्पल, असं त्याने मला सांगितलं. त्याने मला त्याच्यासाठी स्लीपरची व्यवस्था करायला सांगितली आणि मी उडालोच. मी ऐकून हैराण झालो होतो. पण विजय देवरकोंडाचा यामागचा हेतू मला कळला. आधी मला थोडं विचित्र वाटलं पण नंतर संपूर्ण देशात याची चर्चा होणार, हे मला कळून चुकलं होतं.
विशेष म्हणजे, झालंही तेच. विजयच्या डाऊन टू अर्थ लुकची देशभर चर्चा झाली. ‘लाइगर’ सिनेमात विजय देवरकोंडाने एका गरिब मुलाची भूमिका साकारली आहे. त्यामुळे विजय देवरकोंडाचे जाणीवपूर्वक ‘लाइगर’च्या प्रमोशनसाठी सिंपल निवडला आणि त्याला जे हवं होतं, ते सुद्धा साध्य झालं.