सुप्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचे नुकतेच निधन झाले. 25 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या निधनानंतरच एका अफेवेने डोके वर काढले. एसपी सुमारे महिनाभर चेन्नईच्या रूग्णालयात भरती होते. याचठिकाणी त्यांनी अंतिम श्वास घेतला. मात्र रूग्णालयाने संपूर्ण बिल भरल्याशिवाय त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यास नकार दिल्याचे वृत्त एसपींच्या निधनानंतर आले. सोशल मीडियावरही हे वृत्त व्हायरल झाले. सरतेशेवटी उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी सुब्रमण्यम यांच्या रूग्णालयाचे संपूर्ण बिल भरल्याचे या वृत्तात म्हटले गेले होते. आता या वृत्तावर सुब्रमण्यम यांचा मुलगा एसपी चरण याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
पित्याच्या निधनानंतर अशा अफवा ऐकणे, दु:खद व दुर्दैवी आहे़. हॉस्पिटलच्या बिलाबद्दल अफवा पसरवली गेली. काही बिल आम्ही भरले आणि उर्वरित बिल भरण्यासाठी आम्ही तामिळनाडू सरकारला विनंती केली, मात्र तामिळनाडू सरकारने बिल भरण्यास नकार दिला. यानंतर उपराष्ट्रपतींनी बिलाची संपूर्ण रक्कम भरली, अशी ही संपूर्ण अफवा होती. बिलाची संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय हॉस्पिटलने माझ्या पित्याचे पार्थिव देण्यास नकार दिला, असेही यात म्हटले गेले. हे वृत्त मुळातच निराधार आहे. लोक अशा अफवा का पसरवतात, मला माहित नाही. अशा अफवांमुळे संबंधितांना किती अपमानास्पद वाटत असेल, याचाही लोक विचार करत नाहीत, अशा शब्दांत चरण यांनी आपली नाराजी व्यक्त केली.पुढे चरण म्हणाले, अफवा पसरवणा-यांना मी माफ केले आहे. पण माझ्या मते, अशा लोकांना आणखी प्रगल्भ होण्याची गरज आहे. उपचार, बिलाची रक्कम काहीही माहित नसताना अशा अफवा पेरणे दुर्दैवी आहे. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी मी आणि संबंधित रूग्णालय प्रशासन लवकरच अधिकृत खुलासा जारी करणार आहोत. सोशल मीडियावर अफवा पसरवणे आणि लोकांच्या आयुष्यात गुंता निर्माण करणे आज सोपे झाले आहे.
महिनाभर होते रूग्णालयात भरती होते
गत 25 सप्टेंबरला दिग्गज गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 74 वर्षांचे होते. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मातही केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. तेव्हापासून ते रूग्णालयात भरती होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
ते शब्द जिव्हारी लागले अन् बालसुब्रमण्यम झाडाखाली बसून ढसाढसा रडले...!!
एसपी बालसुब्रमण्यम यांना व्हायचं होतं इंजिनिअर, एका दिवसात २१ गाणी गाऊन केला होता रेकॉर्ड
स्वत: बालसुब्रमण्यम यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती.74 वर्षांच्या बालसुब्रमण्यम यांनी 16 विविध भाषांमधील जवळपास 40 हजारांवर गाणी गायली. तेलगू, तामिळ,कन्नड, आणि हिंदी गाण्यांसाठी त्यांना सहावेळी सर्वोत्कृष्ट गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2001 मध्ये त्यांना पद्मश्रीने तर 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.1989 साली आलेल्या मैनें प्यार किया या सलमानच्या चित्रपटातील सर्व गाणी बालसुब्रमण्यम यांनी गायली होती. ही सर्व गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. सलमानच्या करिअरच्या सुरुवातीला सलमानसाठी त्यांनी अनेक गाणी गायली. अनेक वर्षे ‘सलमानचा आवाज’ म्हणूनच ते ओळखले जात होते.