Join us

​स्मृतीदिन विशेष : अशी झाली होती आर. डी. बर्मन आणि आशा भोसले यांची पहिली भेट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2017 12:15 PM

सन १९९४ मध्ये आजच्याच दिवशी(४ जानेवारी) भारतीय चित्रपटसृष्टीला अजरामर गीतांचा नजराणा देणारे सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी जगाचा ...

सन १९९४ मध्ये आजच्याच दिवशी(४ जानेवारी) भारतीय चित्रपटसृष्टीला अजरामर गीतांचा नजराणा देणारे सर्वोत्कृष्ट संगीतकार आर. डी. बर्मन यांनी जगाचा निरोप घेतला होता. आज त्यांचा स्मृतीदिन. पंचमदा नावाने प्रसिद्ध असलेले आर. डी. बर्मन आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक प्रसिद्ध गाण्यांचे सूर आजही आपल्या कानात रूंजी घालतात.आर. डी. बर्मन चित्रपटसृष्टीत पंचमदा नावाने ओळखले जात. याशिवायही तुबलु नावानेही ते परिचित होते. हे नाव त्यांना त्यांच्या आजीने दिले होते. तर पंचम हे नाव अशोक कुमार यांनी त्यांना बहाल केले होते. वयाचे नववे वर्ष म्हणजे खेळण्या-बागडण्याचे वय. पण याच वयात आरडींनी आपले पहिले गाणे संगीतबद्ध केले होते. १९५६ मध्ये आलेल्या ‘फंटूश’ या चित्रपटात हे गाणे वापरण्यात आले होते.    प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल आर. डी. बर्मन यांच्या आॅर्केस्ट्रामध्ये वाद्य वाजवत असत. कुमार शानू, अभिजीत, मोहम्मद अजीज, शबीर कुमारसारख्या अनेक नवोदित गायकांना पंचमदांनी पहिल्यांदा गायनाची संधी दिली. संगीतात नवीन प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती.‘चुरा लिया’ या गाण्यासाठी ग्लासवर चमच्याने हळूवार प्रहार करून त्यांनी आवाज ध्वनिमुद्रित केला होता. एकदा पावसाचा आवाज ध्वनीमुद्रित करण्यासाठी त्यांनी अख्खी रात्र पावसात घालवली होती. पंचमदा यांनी दोन लग्ने केलीत. त्यांच्या पहिला लग्नाचा किस्सा एखाद्या बॉलिवूडपटाची कथा वाटाचा असा आहे. यानंतर ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यासोबत त्यांचे सूर जुळले. १९८० मध्ये पंचमदांनी आशा भोसलेंशी दुसरे लग्न केले. पहिले लग्नआर. डी. बर्मन यांच्या पहिल्या पत्नी म्हणजे रिटा पटेल. रिटा पटेल ही खरे तर आर. डी. बर्मन यांची एक चाहती होती. दार्जिलिंगमध्ये दोघांचीही भेट झाली. बर्मन यांच्यासोबत मुव्ही डेटला जाण्याची पैज रिटाने तिच्या मैत्रिणींशी लावली होती. ही पैज अर्थात रिटाने जिंकली. बर्मन यांच्यासोबत आधी रिटाची चांगली मैत्री होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे लग्नात झाले. १९६६ मध्ये बर्मन आणि रिटा विवाहबंधनात अडकले. अर्थात हे लग्न फार काळ टिकले नाहीतच. १९७१ मध्ये दोघेही परस्परांपासून विभक्त झालेत. यानंतर पंचमदांच्या आयुष्यात आल्या त्या आशा भोसले.पंचमदा व आशा भोसले यांची प्रेमकथाआशा भोसले यांनी वयाच्या १६ वर्षी घरून पळून जात त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाच्या प्रियकराशी(गणपतराव भोसले) लग्न केले होते. गणपतराव लता मंगेशकर यांचे पीए होते. पण हा विवाह अपयशी ठरला. दोन मुलांसह आणि पोटातल्या एका गर्भासह आशा भोसले आपल्या माहेरी परतल्या. म्हणजेच आर.डी. बर्मन यांना आशा दी भेटल्या तेव्हा त्या तीन मुलांच्या आई होत्या. १०६६ मध्ये  ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटात आशा दींना आर. डी. बर्मन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने आशादींना मोठी ओळख मिळवून दिली. आशा दींनी आर. डींसोबत कॅबे्र, रॉक, डिस्को, गझल, शास्त्रीय संगीत अशा अनेक धाटणीची गाणी केलीत. १९८० मध्ये आर डी व आशा दींनी अनेक प्रसिद्ध गाणी रेकॉर्ड केली. पुढे संगीत क्षेत्रातील हीच भागीदारी लग्नात परवर्तित झाली. पंचमदा आशा भोसले यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे होते. त्यामुळे या दोघांच्या लग्नाला बराच विरोधही झाला. पण त्यांनी कुणाचेही न ऐकता एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पंचमदा व आशा भोसले यांच्या संगीत याशिवाय आणखी एक गोष्ट कॉमन होती, कदाचित हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे. ही गोष्ट म्हणजे, वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवणे. कोण सर्वात चांगली डीश बनवतं, यावरून आशा दी व पंचमदा यांच्यात अनेकदा गोड तक्रार व्हायची. याच गोड तक्रारीतून पुढे दोघांमध्ये प्रेम बहरत गेल्याचे मानले जाते. १९८० मध्ये आशा दींनी आर.डींसोबत विवाह केला. आर. डींच्या अंतिम श्वासापर्यंत आशा दींनी त्यांना सोबत केली.