अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या सिनेमाचं टायटल अद्याप ठरलेलं नाही. मात्र हा 'आशिकी ३' असण्याचा अनेकांचा अंदाज आहे. वाढलेली दाढी, केस अशा लूकमध्ये कार्तिक स्टेजवर गिटार वाजवत गाताना दिसतो. रणबीर कपूरच्या रॉकस्टारचीच आठवण करुन त्याचा लूक आहे. तर श्रीलाला निरागस लूकमध्ये आहे. नुकतंच दोघांनी सिनेमासंबंधी एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. त्यावेळी कार्तिक पुढे चालत होता तर मागून येणाऱ्या श्रीलीलाला चक्क गर्दीने खेचून घेतलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कार्तिक आणि श्रीलीलाला यांची जोडी सध्या बीटाऊनमध्ये चर्चेत आहे. प्रेक्षकही त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. नुकतेच ते एका इव्हेंटमध्ये पोहोचले असता त्यांची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुडुंब गर्दी जमली. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा होती. कार्तिक आर्यन पुढे चालत होता तर मागून श्रीलीला येत होती. सुरक्षा असतानाही बघता बघता श्रीलीलाला अचानक चाहत्यांनी गर्दीत अक्षरश: खेचून घेतले. काही सेकंदांसाठी तीही घाबरलेली दिसत आहे. सुरक्षारक्षकांनी लगेच तिची सुटका केली. पुढे चालत असलेल्या कार्तिकला मात्र याचा थांगपत्ताही लागला नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
'हे फारच भयानक आहे','सुरक्षारक्षक काय करत होते?','सेलिब्रिटींसोबत अशा प्रकारचं वर्तन योग्य नाही','बाऊन्सर्सने त्यांच्यावर कामावर लक्ष देण्याची गरज आहे. अशा गर्दीत सेलिब्रिटीच काय कोणीही सामान्य मुलगीही ओढली जाईल' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्हिडिओवर दिल्या आहेत.
कधी रिलीज होणार कार्तिक-श्रीलीलाचा सिनेमा?
कार्तिक-श्रीलीलाच्या सिनेमाच्या आगामी सिनेमाला सध्या तरी 'आशिकी ३'च नाव देण्यात आलं आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज होणार आहे. अनुराग बसू यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमासंबंधी 'तू मेरी जिंदगी है' अशा आशयाचा फर्स्ट लूक समोर आला. या सिनेमासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत.