श्रीलंकेच्या राजधानीत आज सकाळी आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. मुख्यत्वाने चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये हे बॉम्ब स्फोट झाले असून या स्फोटांमधील मृत्यूचा आकडा १५६ वर पोहोचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच ३०० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे कळतेय. मृत्यूमध्ये ३५ विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण जगभरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकेच्या राजधानीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे जॅकलिन फर्नांडिस हिने दु:ख व्यक्त केले आहे. याप्रकारची हिंसा ताबडतोब थांबावी, असे ट्विट तिने केले आहे.
विवेक ओबेरॉय अभिनेता विवेक ओबेरॉयनेही या घटनेचा निषेध केला आहे. ‘मन सुन्न करणारा हा हल्ला आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांचा मी जाहीरपणे निषेध करतो. हल्ल्यातील पीडित व्यक्तींच्या दु:खात मी सहभागी आहे.’
हुमा कुरेशीअभिनेत्री हुमा कुरेशीनेही या घटनेविषयी तिचं मत व्यक्त केलं आहे. ‘ईस्टर डेच्या दिवशी जे नागरिक चर्चमध्ये जात होते. अशा निरपराध व्यक्तींवर हा भ्याड हल्ला करण्यात आला. हा हल्ला प्रचंड वेदनादायी आहे. या जगात नक्की काय सुरु आहे?’ असं म्हणत हुमाने तिचा संताप व्यक्त केला आहे.
अनुष्का शर्माश्रीलंकेत झालेला साखळी बॉम्बस्फोट मन विषण्ण करणारा आहे. आम्ही सारेच पीडितांच्या दु:खात सहभागी आहोत, असं ट्विट अभिनेत्री अनुष्का शर्माने केलं आहे.
विवेक दहिया‘रविवारी सकाळी श्रीलंकेच्या राजधानीमध्ये झालेला साखळी बॉम्बस्फोट हल्ला हा हृदय पिळवटून टाकणारा आहे. ही घटना खरंच प्रचंड धक्कादायक आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे,’ असं ट्विट छोट्या पडद्यावरील अभिनेता विवेक दहियाने केलं आहे.
दरम्यान, जॅकलीन फर्नांडिस, इलियाना डिक्रूज, इशा गुप्ता, सोनू सुद, स्वरा भास्कर या कलाकारांनीही ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यासोबतच पीडितांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.