बॉलिवूडची हवा-हवाई, ख्वाबो की शहजादी अशा एक ना अनेक नावांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची अकाली एक्झिट प्रेक्षकांना चटका लावून जाणारी होती. आज म्हणजेच २४ फेब्रुवारीला त्यांचा पहिला स्मृती दिन असून वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांचे पती बोनी कपूर त्यांच्यासोबत होते.
श्रीदेवी एका लग्नासाठी दुबईला गेल्या होत्या आणि जुमैरा एमिरेट्स टॉवरमध्ये राहात होत्या. याच हॉटेलमधील वॉशरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. श्रीदेवी आणि त्यांचे पती बोनी कपूर डिनरला बाहेर जाणार असल्याने त्या आवरायला वॉशरूमला गेल्या होत्या. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्या बाहेर आल्या नाहीत. त्यामुळे बोनी कपूर यांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी वॉशरूमचा दरवाजा तोडला असता पाण्याने भरलेल्या बाथटबमध्ये श्रीदेवी त्यांना दिसल्या. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्या शुद्धीवर न आल्याने बोनी कपूर यांनी त्यांच्या एका मित्राला फोन केला. त्यानंतर त्यांनी ही सगळी माहिती पोलिसांना दिली होती. ही बातमी प्रसारमाध्यमात आल्यानंतर श्रीदेवी यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला वर्षं झाले असले तरी या दुःखातून आजही त्यांचे कुटुंब सावरलेले नाही. श्रीदेवी यांच्या आठवणींना जतन करून ठेवण्यासाठी बोनी कपूर लवकरच श्रीदेवी यांच्या जीवनावर एक डॉक्यूमेंट्री बनवणार आहेत. या डॉक्यूमेंट्रीसाठी बोनी कपूर यांनी श्री, श्रीदेवी आणि श्रीदेवी मॅम हे तीन टायटल रजिस्टर सुद्धा केले आहेत.
श्रीदेवी यांनी काम केलेल्या सिनेमांचे टायटलही बोनी कपूर यांनी रजिस्टर केले आहे. त्यांनी एकूण 20 टायटल्स रजिस्टर केली असून या डॉक्यूमेंट्रीमध्ये सगळेच रिअल फुटेज वापरले जाणार आहेत. त्यामुळे श्रीदेवी यांचं जगणं एका वेगळ्याप्रकारे त्यांच्या चाहत्यांसमोर येणार आहे.