श्रीदेवी आणि कमल हासन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांचा सदमा हा चित्रपट तर आजही प्रेक्षकांना आठवतो. या चित्रपटातील दोघांच्याही अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. त्या दोघांनी २७ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
कमल हासन यांचा विश्वरूपम २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान कमल हासन यांनी श्रीदेवी यांच्या अनेक आठवणी जागवल्या. त्यांची पहिली ओळख कुठे झाली होती हे आज देखील कमल हासन यांच्या लक्षात आहे. याविषयी कमल हासन सांगतात, आम्ही दोघांनीही चाइल्ड आर्टिस्ट म्हणून आमच्या करियरला सुरुवात केली. आमच्या दोघांची ओळख खूपच लहान वयात झाली होती. त्यावेळी श्रीदेवी या १५ तर मी १९ वर्षांचा होता. त्यावेळी माझे गुरू मास्टर बाला चंदर आम्हाला ट्रेनिंग देत होते. मी त्या लहान मुलांमध्ये सगळ्यात मोठा असल्याने लहान कलाकारांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. कधी कधी बाला सर श्रीदेवी यांची जबाबदारी देखील माझ्यावर सोपवायचे. त्यावेळी मी सगळ्यांना सांभाळून घेत असल्याने त्या मला तेव्हापासूनच सर अशी हाक मारायला लागल्या. त्यांनी शेवटपर्यंत मला कधीच सर या नावाशिवाय हाक मारली नाही. श्रीदेवी या माझ्यापेक्षा वयाने लहान होत्या. आमची भेट झाली, त्यावेळी तर त्या खूपच लहान होत्या. सुरुवातीची काही वर्षं मी त्यांना एकेरी हाक मारत असे. पण नंतर त्यांना मी एकेरी हाक मारणे बंद केले.
श्रीदेवी आणि कमल हासन हे अनेक वर्षं एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. श्रीदेवी यांच्या निधनाच्या काही दिवस आधी देखील त्या दोघांचे बोलणे झाले होते. याविषयी कमल हासन सांगतात, श्रीदेवी आणि मी कधीच राजकारणावर बोललो नव्हतो. पण त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही दोघांनी राजकारणावर गप्पा मारल्या. त्यांनी तामिळनाडूच्या राजकिय परिस्थितीविषयी मला विचारले. त्यावर मी त्यांना तुम्ही आता मोठे झाले आहात असे बोलत त्यांची फिरकी देखील घेतली होती.