Join us

​श्रीदेवींना ‘अखेर’च्या चित्रपटासाठी मिळाला ‘पहिला’ राष्ट्रीय पुरस्कार, ३०० चित्रपटांपर्यंत करावी लागली प्रतीक्षा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 10:39 AM

श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण कदाचित असत्या तर आजचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला असता. कारण आज श्रीदेवींना ‘मॉम’ या ...

श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण कदाचित असत्या तर आजचा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला असता. कारण आज श्रीदेवींना ‘मॉम’ या कारकिर्दीतील अखेरच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला. आपल्या करिअरमध्ये ३०० चित्रपट करणा-या श्रीदेवींना अखेरच्या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळावा आणि तोही मरणोत्तर, हा एक दैवदुर्लभ योग म्हणता येईल. १९८९ मध्ये श्रीदेवींच्या ‘चांदनी’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिळालेला श्रीदेवींचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार ठरला. विशेष म्हणजे, मरणोत्तर त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट श्रेणीत मरणोत्तर पुरस्कार मिळवणा-या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. २०१७ साली आलेला ‘मॉम’ हा श्रीदेवींचा ३०० वा आणि अखेरचा चित्रपट होता. रवी उदयावर दिग्दर्शित या क्राईम थ्रीलर चित्रपटात श्रीदेवींनी आईची भूमिका साकारली होती. बलात्कार झालेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणा-या देवकी साराभाई नामक महिलेची व्यक्तिरेखा त्यांनी जिवंत केली होती. ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांला ६३ व्या फिल्म फेअर पुरस्कारांत सहा नामांकने मिळाली होती. या चित्रपटासोबत श्रीदेवींनी ३०० चित्रपटांचा गप्पा गाठला. पण हा चित्रपट श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ठरला. गत २४ फेब्रुवारीला दुबईच्या एका हॉटेलात श्रीदेवींनी अंतिम श्वास घेत जगाचा निरोप घेतला. बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या.    श्रीदेवींच्या आयुष्याची उणीपुरी ५० वर्षे बॉलिवूडला समर्पित राहिलीत. केवळ वयाच्या चौथ्या वर्षी  श्रीदेवी पहिल्यांदा कॅमे-यापुढे उभ्या राहिल्या आणि पुढे बॉलिवूडला त्यांनी अनेक हिट चित्रपटांचा नजराना दिला. म्हणूनच श्रीदेवींना हिंदी चित्रपटांच्या पहिल्या लेडी सुपरस्टार म्हटले जाते.ALSO READ : ​अलविदा चांदनी...!  हजारोंच्या गर्दीने साश्रूनयनांनी दिला निरोप!