श्रीदेवी यांनी लेक जान्हवीचा गेला वाढदिवस असा केला होता सेलिब्रेट; आठवणींनी चाहते गहिवरले!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 12:10 PM
बॉलिवूडच्या सुपरस्टार श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली असून, अश्रुनयनांनी त्यांना निरोप दिला जात आहे. थोड्याच ...
बॉलिवूडच्या सुपरस्टार श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने त्यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली असून, अश्रुनयनांनी त्यांना निरोप दिला जात आहे. थोड्याच वेळात श्रीदेवी पंचत्वात विलीन होणार असून, त्यांच्या चाहत्यांचा शोक अनावर झाल्याचे दिसून येत आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी श्रीदेवी यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली असून, यावर विश्वास ठेवणे अजूनही अनेकांना अशक्य होताना दिसत आहे. त्यांच्या दोन्ही मुलींना तर स्वत:ला सावरणे मुश्कील झाले आहे. मोठी मुलगी जान्हवी आणि लहान मुलगी खुशी यांना धीर देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड एकवटले असले तरी, त्यातून त्या कशा सावरतील, असाच प्रश्न अनेकांना पडला आहे. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी हिचा आजपासून बरोबर सात दिवसांनी वाढदिवस आहे. यादिवशी जान्हवी २१ वर्षांची होणार आहे. मात्र पहिल्यांदाच जान्हवीसोबत तिची मॉम श्रीदेवी नसणार आहे. जान्हवीच्या गेल्या वाढदिवसाला श्रीदेवी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्पेशल पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये फोटो शेअर करताना श्रीदेवी यांनी ‘Happy birthday to my angel, the most precious thing to me in the world, wish you the best birthday my baby love you’ असे लिहिले होते. वास्तविक जान्हवी श्रीदेवीच्या खूप क्लोज होती. त्यात श्रीदेवी यांची ती पहिलीच मुलगी असल्याने तिला त्यांचे प्रचंड प्रेम लाभले. प्रत्येक इव्हेंटमध्ये श्रीदेवी आणि जान्हवी एकत्र बघावयास मिळत असत. जान्हवीच्या पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी यांनीच तिला ग्रूम केले होते. जान्हवी करण जोहरच्या ‘धडक’ या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. परंतु दुर्दैवाने तिचा डेब्यू बघण्यासाठी श्रीदेवी या जगात नाहीत.