जगभरातील सिनेप्रेमींना ‘सदमा’ देऊन गेलेली बॉलिवूडची ‘चांदनी’, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला आता वर्षाहून अधिक कालावधी लोटून गेला आहे. श्रीदेवी यांनी एक बालकलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतरच्या काळात बॉलिवूडवर राज्य केले. श्रीदेवी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता श्रीदेवी यांच्या आयुष्यावर एक पुस्तक येणार असून याची घोषणा नुकतीच करण्यात आली.
श्रीदेवी यांच्या आयुष्यावर पेंग्विन हाऊस इंडिया पुस्तक प्रकाशित करणार असून याची घोषणा नुकतीच करण्यात आली. ‘श्रीदेवी : गर्ल वुमन सुपरस्टार’sridevi : girl woman superstar असं या पुस्तकाचे नाव असून सत्यार्थ नायक या पुस्तकाचे लेखन करणार आहेत. पेंग्विन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या पुस्तकात श्रीदेवी यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी लोकांना वाचायला मिळणार आहेत. या पुस्तकात त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. श्रीदेवी यांच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी लोकांना या पुस्तकाद्वारे जाणून घ्यायला मिळणार आहे. या पुस्तकासाठी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी देखील परवानगी दिली असल्याचे कळतेय.
श्रीदेवी यांचे हे पुस्तक ऑक्टोबर 2019 मध्ये प्रकाशित करण्यात येणार असून या पुस्तकाचे ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. लेखक सत्यार्थ यांनी या पुस्तकाविषयी बोलताना सांगितले की, मी नेहमीच श्रीदेवी यांचा मोठा चाहाता असून त्यांचा प्रवास मला माझ्या शब्दांत मांडता आला याचा मला आनंद होत आहे. या पुस्तकाच्या संदर्भात मी इंडस्ट्रीतील अनेक लोकांशी बोललो असून त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबतचे आपले अनेक अनुभव शेअर केले. त्यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास या पुस्तकातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
दुबईतील जुमेरा एमिरेट्स टॉवर्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीच्या रात्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर श्रीदेवी यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. या मृत्यूची बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. काही जणांनी या मृत्यूबद्दल शंकाही उपस्थित केल्या होत्या. पण त्यावर हळूहळू पडदा पडला.