RRR director SS Rajamouli-Rama Rajamouli love story: बाहुबली सीरिजनंतर दोनचं नावं चर्चेत आली, एक होतं साऊथ सुपरस्टार प्रभासचं आणि दुसरं या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचं. बाहुबली सीरिज आणि आताश: रिलीज झालेला ‘आरआरआर’नंतर राजमौली नंबर 1 दिग्दर्शक बनले आहेत. राजमौलींच्या कामाबद्दल, सिनेमांबद्दल सगळेच जाणतात .पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. कारण राजमौली अतिशय प्रायव्हेट पर्सन आहेत. साहजिकच त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
आपल्या खासगी आयुष्याबद्दल कधीच न बोलणाऱ्या राजमौलींनी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या पत्नीचं नाव रमा आहे. त्याकाळात रमासोबत लग्न करण्याच्या राजमौलींच्या धाडसी निर्णयाची साऊथ इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली होती.2001 मध्ये राजामौलींनी रमा यांच्यासोबत लग्न केलं. राजामौली यांच्या पत्नी रमा राजामौली या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. लग्नानंतर रमा यांनी राजामौली यांच्या ‘साई’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून आज ‘आरआरआर’पर्यंत राजमौलींच्या प्रत्येक चित्रपटाचं कॉस्च्युम डिझायनिंग रमा बघतात. राजामौली यांची पत्नी रमा बाहुबली आणि आरआरआर चित्रपटांचे संगीतकार एमएम किरवाणी यांची पत्नी श्रीवल्लीची धाकटी बहीण आहे.
फार कमी वयात रमा यांचं पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून त्यांना एसएस कार्तिकेय हा मुलगाही झाला. पण या लग्नात रमा खूश नव्हत्या. राजामौली आणि रमा हे एकमेकांना दीर्घकाळापासून ओळखत होते आणि दोघांमध्ये चांगली मैत्री होती. अशा परिस्थितीत दिग्दर्शक राजामौली यांनी रमाला तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट मिळवून देण्यात खूप मदत केली. रमाने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर राजामौली यांना रमावरील प्रेमाची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी रमाला लग्नासाठी प्रपोज केलं.
रमा राजामौली यांनी लग्नासाठी होकार दिल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी अत्यंत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. घटस्फोटाच्या वेळी रमाने कोर्टातून आपल्या मुलाचा ताबा मिळवला होता. राजामौली यांनी रमाला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा त्यांनी रमा यांचा मुलगा कार्तिकेय याला दत्तक घेत त्याला स्वत:चं नाव (एसएस कार्तिकेय) दिलं. यानंतर दोघांनी एक मुलगीही दत्तक घेतली. त्यानंतर तिचं नाव एसएस मयुखा ठेवलं.