Join us

'हो..मी बायसेक्शुअल आहे'; जाहीरपणे सांगणारी कोण आहे ही स्टँडअप कॉमेडियन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:00 IST

Swati sachdeva:काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन स्वाती सचदेवचा 'लव्ह इज लव्ह' हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या बायसेक्शुअल असण्याविषयी भाष्य केलं.

सध्या सोशल मीडियावर स्वाती सचदेव (Swati Sachdeva) हे नाव जोरदार चर्चेत येत आहे. स्टँडअप कॉमेडी करत असताना स्वातीने जाहीरपणे ती बायसेक्शुअल असल्याचं सांगितलं. तिच्यातील या बिंधास्तपणामुळे आणि आत्मविश्वासामुळे ती सध्या चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर स्वातीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि ती रातोरात प्रकाशझोतात आली. अनेकांनी स्वातीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच, बेधडकपणे बायसेक्शुअल असल्याचं सांगणारी स्वाती नेमकी कोण ते जाणून घेऊयात.

काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन स्वाती सचदेवचा 'लव्ह इज लव्ह' हा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या बायसेक्शुअल असण्याविषयी भाष्य केलं. तसंच आपल्याविषयी घरातल्यांना समजल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती हेदेखील तिने सांगितलं. विशेष म्हणजे हा नाजूक विषय अत्यंत सुंदररित्या तिने जगासमोर मांडल्यामुळे सर्व स्तरांमधून तिचं कौतुक होत आहे.

'माझ्या वडिलांना बायसेक्शुअल म्हणजे काय माहित नाही. त्यांना फक्त लेस्बियन म्हणजे काय हेच माहित होतं', असं म्हणत स्वातीने घरी सत्य सांगितल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झालेली हे सांगितलं. सध्या सोशल मीडियावर स्वातीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून ९ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये तिने LGBTQ+ समुदायाविषयी भाष्य केलं आहे.

कोण आहे स्वाती सचदेव?

स्वाती एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन असून ती मूळची पंजाबची आहे. सलमान खानची 'वूमन कॉपी' या टोपणनावानेही ती ओळखली जाते. 'लव्ह इज लव्ह' या व्हिडिओमुळे ती एकदम प्रकाशझोतात आली. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार स्वातीने अमिटी विद्यापीठातून अॅडव्हरटायजिंग आणि मार्केटिंगचा अभ्यास केला आहे. स्वातीचं युट्यूब चॅनेल असून ती तिच्या स्टँडअप कॉमेडीचे व्हिडीओ या पेजवर शेअर करत असते. 

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन