बॉलिवूडमध्ये मल्टीस्टारर सिनेमांचा काळ पुन्हा आला आहे. 'कलंक', 'तख्त', 'पानीपत' यांसारखे चित्रपट बनत आहेत. ज्यात बऱ्याच कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. ७० व ८०च्या दशकात सिनेमामध्ये दिग्गज कलाकार एकत्र काम करताना दिसायचे. 'जग्गा जासूस' सिनेमानंतर दिग्दर्शक अनुराग बासू नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ते 'लाइफ इन मेट्रो' या चित्रपटाचा सिक्वल बनवत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
'लाइफ इन मेट्रो' चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, शिल्पा शेट्टी, इरफान खान, केके मेनन, शर्मन जोशी यांसारख्या कलाकारांनी काम केले होते. आता या चित्रपटाचा सिक्वल येत असून अद्याप या सिनेमाचे शीर्षक ठरलेले नाही. मात्र कलाकारांची निवड झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, राजकुमार राव, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू व ईशान खट्टर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आणखीन एक अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. मात्र या अभिनेत्रीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. या सिनेमाला संगीत प्रीतम देणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग बसूला रणबीर कपूरला या चित्रपटात घ्यायचे होते. पण, त्याने मल्टीस्टारर चित्रपटात काम करण्यास नकार दिला. चार शहरांतील चार कथा असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. समीक्षकांनीही चित्रपटाची प्रशंसा केली होती. आता त्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यासाठी कलाकारांचीही निवड झाली आहे. 'डीएनए'च्या रिपोर्टनुसार, अनुरागने स्वत: या सिक्वलची पटकथा लिहिली असून त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती होणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच यामध्येही वेगवेगळ्या कथा असणार आहेत.