बॉलिवूडमधील स्टार किड्सच्या यादीत वाढ होताना दिसत आहे. आलिया भट, जान्हवी कपूर, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, सारा अली खान, ईशान खट्टर या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. लवकरच चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तर शाहरूख खानची मुलगी सुहानादेखील पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू होती. या यादीत आता आणखीन एका स्टार किड्सचा समावेश होणार आहे.
अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. ती अभिनेता सैफ अली खानसोबत झळकणार आहे. ते दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार असून जवानी जानेमन या चित्रपटात ते दिसणार आहेत. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सैफ अली खानच या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. यात आलिया त्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनला होणार आहे. नितीन कक्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
सैफ अली खान वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसतो, त्याबद्दल तो म्हणाला की, मी चित्रपटसृष्टीत माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्यावेळी कलाकार त्याच त्याच प्रकारची भूमिका साकारत असे. पण आता चित्रपटसृष्टी खूप बदलली आहे. चित्रपटांमध्ये अनेक प्रयोग केले जात आहे. कथा वेगवेगळ्या प्रकारच्या येत आहेत. दिग्दर्शक, निर्माते वेगळ्या प्रकारे विचार करत आहेत. या सगळ्यामुळे आम्हा कलाकारांना देखील खूप चांगल्या भूमिका साकारायला मिळत आहेत. चित्रपटसृष्टीतील हा बदल 'लगान' या चित्रपटानंतर झाला असे मला वाटते. प्रत्येक व्यक्तीची एक बोलण्याची वेगळी ढब असते, त्याचा आवाज वेगळा असतो या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता डबिंगवर देखील प्रचंड मेहनत घेतली जात आहे. पूर्वी तर माझ्या संवाद म्हणण्याच्या स्टाईलची लोक नक्कल देखील करायचे. पण आता लोक माझ्या भूमिकांच्या, माझ्या अभिनयाच्या प्रेमात आहेत.