मॅडॉक फिल्म्सचा 'स्त्री 2' (Stree 2) बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बऱ्याच दिवसांनंतर बॉलिवूड सिनेमाला या प्रमाणात यश मिळालं आहे. २०१८ साली आलेला 'स्त्री' चांगलाच गाजला होता. पण ६ वर्षांनंतर सिनेमाच्या आलेल्या सीक्वेलने कमालच केली आहे. 'स्त्री 2' हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे जो ६०० कोटींच्या घरात प्रवेश करतो. याआधी कोणत्याही हिंदी सिनेमाला ६०० कोटींपर्यंत मजल मारता आलेली नाही. स्त्री २ ची क्रेझ अजूनही थांबलेली नसून सिनेमा सातव्या आठवड्यात प्रवेश करतोय.
राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषएक बॅनर्जी यांची तुफान कॉमेडी आणि श्रद्धा कपूरचा जलवा यामुळे 'स्त्री २' प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आज रविवारी स्त्री २ नवा इतिहास बनवणार आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरणार आहे. सहाव्या आठवड्यातही 'स्त्री २' लोकप्रियता अबाधित आहे. प्रेक्षक दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदाही सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. तसंच आता सिनेमा ६०० कोटी क्लबमध्ये पोहोचत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या पोस्टनुसार, 'स्त्री २'ने सहाव्या शुक्रवारी ५.२० कोटी, शनिवारी ३.८० कोटी कमावले आहेत. तर आजचा रविवारचा आकडा यायचा आहे. यासोबत सध्या सिनेमाने देशभरात ५९८.९० कोटींची कमाई केली आहे. आता सिनेमा ६०० कोटींपासून फार लांब नाही. याआधी कोणत्याही हिंदी सिनेमाला हे यश मिळवता आलेलं नाही.
'स्त्री २' च्या आधी २०१७ मध्ये 'बाहुबली २'ने ५०० कोटी कमावले होते. तसंच 'जवान', 'अॅनिमल' नेही ५०० कोटींचा आकडा पार केला होता. मात्र 'स्त्री २'ने सर्वांनाच मागे टाकले आहे. मॅडॉक फिल्म्सच्या या हॉरर कॉमेडीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
'स्त्री २' मध्ये मुख्य कलाकारांशिवाय अक्षय कुमार, तमन्ना भाटिया आणि वरुण धवन यांचा कॅमिओही आहे. तसंच 'स्त्री ३' वरही काम सुरु झालं आहे.