यश-अपयश कुणाच्याही हातात नसते - श्रद्धा कपूर
By तेजल गावडे | Published: August 9, 2018 02:55 PM2018-08-09T14:55:29+5:302018-08-09T15:03:47+5:30
श्रद्धाचे 'आशिकी २', 'बागी', 'ओके जानू' व 'हाफ गर्लफ्रेंड' हे चित्रपट प्रेक्षकांना खूप भावले.
अभिनेत्री श्रद्धा कपूरने २०१० साली बॉलिवूडमध्ये 'तीन पत्ती' सिनेमातून पदार्पण केले. त्यानंतर 'आशिकी २', 'बागी', 'ओके जानू' व 'हाफ गर्लफ्रेंड' हे तिचे चित्रपट प्रेक्षकांना खूप भावले. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हसीना पारकर' बायोपिकमध्ये तिने मुख्य भूमिका केली होती. आता तिचा 'स्त्री 'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत...
- तेजल गावडे
'हसीना पारकर' बायोपिकला हवे तितके यश मिळाले नाही, या अपयशाकडे तू कोणत्या दृष्टीकोनातून पाहतेस?
चित्रपटाला यश किंवा अपयश मिळणे कुणाच्याही हातात नसते. बॉक्स ऑफिसवर हसीना पारकर बायोपिक कमाल दाखवू शकला नाही. प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमा पाहायला का गेले नाही हे माहित नाही. मात्र मी ऐकले की जेव्हा हा सिनेमा टेलिव्हिजनवर लागला तेव्हा खूप लोकांनी चित्रपट पाहिला व प्रेक्षकांना आवडल्याचेही समजले. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. त्यामुळे करियरमध्ये चढउतार येत असतात. त्याचसोबत लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलतो. हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. मी स्वतःला नशीबवान समजते की माझ्याकडे इतके चांगले चित्रपट आहेत. साहोसहित बत्ती गुल मीटर चालू हा सिनेमादेखील खूप खास आहे. सायना नेहवालच्या बायोपिकसाठी ट्रेनिंग चालू आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला पुढील महिन्यापासून सुरूवात होईल.
आगामी 'स्त्री' चित्रपटाबद्दल थोडक्यात सांग?
स्त्री सिनेमातील स्त्री मी आहे की नाही, हे मी आता सांगणार नाही. हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर समजेल. निश्चितच या चित्रपटाचा एक भाग बनल्यामुळे मी खूप खूश आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट असून खूप वेगळी व हटके या सिनेमाची कथा आहे. हा खूपच एण्टरटेनिंग चित्रपट आहे. जेव्हा मला स्त्रीची कथा ऐकवली तेव्हा मला खूप हसू आले होते. त्यावेळीच मी या सिनेमाचा भाग बनायचे ठरविले. ट्रेलर लोकांना खूप आवडतो आहे. विशेष म्हणजे यातील विनोदी डायलॉग्ज खूप भावत आहेत. आमच्या चित्रपटाचा फ्लेवरच तोच आहे. त्यामुळे मला आशा आहे की चित्रपट पण प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
भूत या जगात आहे, असे तुला वाटते का?
भूत असतात की नाही हे मला माहित नाही. कदाचित असूदेखील शकतात. कारण काही लोक त्यांना आलेले अनुभव शेअर करीत असतात. ते ऐकून असे वाटते की भूत वगैरे असेल. पण, मी अद्याप भूत वगैरे पाहिलेले नाही. त्यामुळे काहीही सांगता येणार आहे.
या सिनेमातील तुझा सहकलाकार राजकुमार राव व इतर कलाकारांबद्दल काय सांगशील?
राजकुमार खूप चांगला कलाकार आहे. मी त्याची खूप मोठी फॅन आहे. त्याच्यासोबत काम करायला मजा आली. तसेच पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी या सगळ्यांसोबत काम करायला खूप मजा आली. हे सगळे चांगले कलाकार आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.
दिग्दर्शक अमर कौशिक यांच्याबद्दल काय सांगशील?
खूप छान अनुभव होता. खूप प्रेमाने काम करून घेतले. कामाच्या बाबतीत ते स्पष्ट होते. त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे, असे अजिबात वाटले देखील नाही. ते खूप पॅशनेट कलाकार आहेत. खूप छान अनुभव होता. तीस ते चाळीस दिवसात आम्ही चित्रीकरण पूर्ण केले आहे.
'मर्द को दर्द होता है...' या चित्रपटाच्या टॅगलाइनबद्दल सांग?
महिलांनी सावधान राहिले पाहिजे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडले नाही पाहिजे. मात्र आम्ही चित्रपटात याउलट सांगितले आहे की पुरूषांनी रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडले नाही पाहिजे. चित्रपटाची टॅगलाइन आहे मर्द को दर्द नही होता. मात्र चित्रपटात मर्दला दर्द होणार आहे. या कथेतून नक्कीच सामाजिक संदेश मिळेल.
आगामी सायना नेहवाल बायोपिकबद्दल सांग?
सायना नेहवाल व दिग्दर्शक अमोल गुप्ता यांना वाटले की मी सायना नेहवालच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन. माझ्यासाठी ही गर्वाची बाब आहे. तिचा जीवनप्रवास खूप लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. ती युथ आयकॉन आहे. तिचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर साकारणे खूप मोठी जबाबदारी आहे. या चित्रपटासाठी सध्या मी बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेते आहे. तसेच जिममध्ये वर्कआऊट करते आहे. बॅडमिंटन खेळणे खूप कठीण आहे. पण मला खेळायला खूप मजा येते आहे. मी या बायोपिकची जोरदार तयारी व खूप मेहनत घेते आहे. सायनाला भेटून तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आहेत.
'साहो' चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच तू पूर्ण केले आहेस, त्याबद्दल काय सांगशील?
मी पहिल्यांदा बायलिंगुअलचा भाग बनणार आहे. हा चित्रपट तेलगू व हिंदी अशा दोन्ही भाषेत चित्रीत केला गेला आहे. खूपच अप्रतिम व चॅलेजिंग अनुभव होता. एका वेगळ्या भाषेत पहिल्यांदाच काम केले आहे. या चित्रीकरणावेळी खूप मजा आली. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.
मराठी चित्रपटाची ऑफर तुला आली आहे का?
अद्याप नाही. मराठी सिनेमात मला काम करायचे आहे. पण मला कोण ऑफरच करत नाही. मला मराठी चित्रपटात काम करण्याची तीव्र इच्छा आहे. मी ऑफरची प्रतीक्षा करत आहे.