बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन लवकरच शंकुतला देवी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटात ती कॅलक्युलेटरहून वेगवान असा ह्यूमन-कंप्यूटर अशी ओळख असणाऱ्या गणितज्ज्ञ शकुंतला देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विद्या वेगवेगळ्या पाच लूकमध्ये दिसणार आहे. शंकुतला देवी यांच्यासारखे हूबेहूब दिसण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. या लूकचे श्रेय मेकअप आर्टिस्ट श्रेयस म्हात्रे, हेअर स्टायलिस्ट शलाका भोंसले आणि स्टायलिस्ट निहारिका भसीन यांना जाते. त्यांना या सिनेमातील विद्याच्या लूकसाठी खूप रिसर्च करावा लागला.
मेकअप आर्टिस्ट श्रेयस म्हात्रे यांनी सांगितले की, मला चित्रपटासाठी शकुंतला देवी यांच्या वयानुसार वेगवेगळे लूक सादर करायचे होते. मी शकुंतला देवी यांचा अभ्यास केला. त्यांचे फोटो पाहिले आणि विद्या यांच्या लूकला त्यांच्या चेहऱ्याशी मिळवण्याचा प्रयत्न केला. शकुंतला देवी यांच्या तरूणपणातील मेकअपसाठी पंधरा ते वीस मिनिटं लागत होती. तर मध्यम वयासाठी चाळीस मिनिटं आणि वयस्कर लूकसाठी एक ते दीड तास मेकअपसाठी लागत होता.
विद्या बालन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच अप्रतिम असतो. त्या नेहमी लूकच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यासाठी तयार असतात, असे श्रेयस यांनी सांगितले.
तर हेअर स्टायलिस्ट शलाका भोंसले यांनी शकुंतला देवी यांचे फोटो पाहून त्या काळाचा रिसर्च केला. शकुंतला देवी यांनी त्यांच्या जीवनातील पायरीवर हेअरस्टाइलमध्ये काही बदल केले होते. त्यानुसार आम्ही हेअर स्टाइलवर काम केले. चित्रपटात आम्ही मोठ्या केसांपासून छोट्या केसांची हेअरस्टाइल दाखवली आहे. काही लूकसाठी तयार करताना कमी वेळ लागायचा तर काही लूकसाठी खूप वेळ जायचा.
विद्या बालन यांच्यासोबत शलाका भोंसले यांनी जवळपास पंधरा वर्षांपूर्वी लगे रहो मुन्नाभाईपासून काम केले आहे. विद्या बालन यांच्यासोबत काम करणे खूप सहज व सोपे आहे. त्या खूप फ्लेक्सिबल आहेत. पात्राच्या गरजेनुसार त्या लूकसाठी काहीही करायला तयार असतात. मी मस्करी करत नाहीये पण शूटिंग सेटवर असताना विद्या बालन कधीच आरसा पाहत नाहीत. त्यांचा विश्वासच आमच्यासाठी सर्व काही आहे. त्या एक स्टार आहेत आणि आमचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे, असे शलाका भोंसले सांगत होत्या. स्टायलिस्ट निहारिका भसीन म्हणाल्या की, साधारण आम्ही एकत्र बसून हेअर, मेकअप व वॉर्डरॉब ठरवतो. एका पात्राच्या लूकसाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आम्ही शकुंतला देवी यांच्या जीवनाबद्दल जाणून घेतले. त्यांच्यावर बराच रिसर्च केला आणि त्यांच्या काळातील फॅशन व स्टाइल कोणत्या प्रचलित होत्या. ते पात्र पुन्हा रिक्रिएट करताना आम्ही त्या स्टाइलचा समावेश केला.
विद्या बालन यांच्यासोबत काम करताना नेहमीच अप्रतिम अनुभव येतो. त्यांच्यासोबत काम करताना त्या तुम्हाला हवा तितका वेळ, स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास देतात. तसेच त्या पात्राला वास्तविक दाखवण्यासाठी आमच्यासोबत त्यांचा देखील सहभाग असतो. नेहमी वेगवेगळे प्रयोग करून पाहण्यासाठी त्या तयार असतात. त्यांच्यासोबतचा अनुभव नेहमीच छान असल्याचा निहारिका यांनी सांगितले. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेटिंग, फोर मोर शॉट्स प्लीज़ सीजन 1 चे दिग्दर्शक अनु मेनन यांनी केले असून याची निर्मिती सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रोडक्शन्स आणि विक्रम मल्होत्रा (अबुंदंतिया एंटरटेनमेंट) द्वारे करण्यात आली आहे. ‘शंकुतला देवी’ चित्रपटामध्ये अभिनेत्री सान्या मल्होत्रा शंकुतला देवीच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शंकुतला देवीचे तिच्या मुलीसोबत जटिल, पण असाधारण नाते होते. तसेच या चित्रपटामध्ये जीशू सेनगुप्ता आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अनु मेनन व नयनिका महतानी यांनी पटकथा लेखन केले असून इशिता मोएत्राने संवाद लेखन केले आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर 31 जुलैला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पहायला मिळणार आहे.