छोट्या पडद्याची लोकप्रीय अभिनेत्री सुचिता त्रिवेदीने वयाच्या ४२ व्या वर्षी लग्नगाठ बांधली. निगम पटेलसोबत सुचिताने लग्न केले. गुजरातच्या भावनगर येथे हा विवाहसोहळा पार पडला.
हळदीचा कार्यक्रम मात्र मुंबईत झाला. लग्नाचे फोटो सुचिताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. सुचिताची बहीण तिला तयार करत असल्याचे एका फोटोत दिसत आहे. यात तिने लाल रंगाचा लाचा घातलेला आहे.
गत दीड दशकांपासून मनोरंजन इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या सुचिताने १९८३ मध्ये अनिल कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘वो सात दिन’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ती छोट्या पडद्याकडे वळली.
सुचिताने ‘फिराक’, ‘कुछ कुछ लोचा है’आणि ‘मिशन कश्मीर’ या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.
ती ‘कॉमेडी सर्कस’मध्येही झळकली होती. ‘घर घर की कहानी’, ‘खिचडी’ आणि ‘बा बहू और बेबी’मध्येही सुचिताने काम केले आहे़ ‘बा बहू और बेबी’मध्ये तिने मीनाक्षी ठक्करची भूमिका साकारली होती़ हे पात्र प्रचंड लोकप्रीय झाले होते.