Join us

आपल्या अटींवर जगली ही ‘पारो’! वाचा, सुचित्रा सेन यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 2:45 PM

आज सुचित्रा सेन यांचा वाढदिवस.

ठळक मुद्दे‘प्रोनॉय पाशा’ हा चित्रपट फ्लॉप झाला. सुचित्रा यांना यामुळे इतका मोठा धक्का बसला की, यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. 

सुचित्रा सेन यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला.  अभिनय आणि सौंदर्याची देणगी लाभलेल्या या अभिनेत्रीने हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली. आज सुचित्रा सेन आपल्यात नाहीत. असत्या तर आज त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला असता. होय, आज 6 एप्रिल सुचित्रा सेन यांचा वाढदिवस.6 एप्रिल 1931 साली त्यांचा जन्म झाला़ त्यांचे खरे नाव रोमा दासगुप्ता. मात्र चित्रपटसृष्टीत त्या सुचित्रा सेन नावाने ओळखल्या गेल्या. सुचित्रा यांनी केवळ 7 हिंदी सिनेमांमध्ये काम केले आणि 25 हिंदी सिनेमे नाकारले होते. होय, याचे कारण म्हणजे, सुचित्रा केवळ आपल्या अटींवर काम करायच्या.

सुचित्रा यांनी बंगाली सिनेमांपासून करिअरची सुरुवात केली. ‘शेष कोथाय’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. पण काही कारणास्तव हा सिनेमा कधीच प्रदर्शित झाला नाही. यानंतर ‘शारे चौत्तोर’ या बंगाली सिनेमात त्या झळकल्या. बंगाली सुपरस्टार उत्तम कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आपल्या अख्ख्या करिअरमध्ये सुचित्रा यांनी 60 सिनेमांत काम केले. यापैकी 30 सिनेमे उत्तम कुमारसोबत होते.

पारोची अजरामर भूमिकाहिंदी सिनेमात त्यांची एन्ट्री झाली ती पारोच्या रूपात. होय, 1955 साली विमल रॉय यांच्या ‘देवदास’ या सिनेमातील पारोची अजरामर भूमिका त्यांनी साकारली. हा सुचित्रा यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. यात सुचित्रा दिलीप कुमारसोबत झळकल्या. या चित्रपटातील अभिनयासाठी सुचित्रा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. ‘देवदास’नंतर त्यांचा ‘आंधी’ हा हिंदी सिनेमा प्रचंड गाजला होता.

कधीच बनला नाही सत्यजीत रे यांचा चित्रपटसुचित्रा सेन आपल्या अटींवर काम करत. होय, दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे देवी चौधरानीच्या आयुष्यावर चित्रपट बनवू इच्छित होते. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून सत्यजीत यांना केवळ सुचित्रा सेन हव्या होत्या. पण सुचित्रा यांनी या चित्रपटाला नकार दिला. मात्र सत्यजीत रे अडून बसले. हा चित्रपट बनवेल तर केवळ सुचित्रा सेनसोबत अन्यथा नाही, असा प्रण त्यांनी घेतला. दुर्दैव म्हणजे, अखेरपर्यंत हा चित्रपट बनलाच नाही.

म्हणून राज कपूर यांना दिला होता नकारशो मॅन राज कपूर यांच्यासोबत काम करण्यास अभिनेत्री एका पायावर तयार असत. पण सुचित्रा सेन यांनी राज कपूर यांनाही नकार दिला होता. याचे कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. याचे कारण म्हणजे राज कपूर यांचे वागणे सुचित्रा यांना खटकले होते. होय, पहिल्या भेटीत राज कपूर यांनी सुचित्रा याचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले होते. पण राज कपूर यांचा फुल देण्याचा अंदाज सुचित्रा यांना आवडला नव्हता. याच कारणामुळे त्यांच्या चित्रपटात काम करण्यास त्यांनी नकार दिला होता.

अचानक सोडले फिल्मी करिअरसुचित्रा सेन यांचे फिल्मी करिअर यशाच्या शिखरावर होते. पण याचदरम्यान त्यांचा ‘प्रोनॉय पाशा’ हा चित्रपट फ्लॉप झाला. सुचित्रा यांना यामुळे इतका मोठा धक्का बसला की, यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. याचमुळे त्यांनी राजेश खन्नासोबतचा ‘नटी विनोदिनी’ हा सिनेमाही नाकारला. हा चित्रपटही नंतर रखडला. 1978 सालानंतर सुचित्रा जणू इंडस्ट्रीतून गायब झाल्यात. 17 जानेवारी   2014 साली त्यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.

 

  

टॅग्स :बॉलिवूडदिलीप कुमार