Join us

सुधा चंद्रन यांना १३ वर्षांपासून मिळाला नाही एकही चित्रपट! असे बोलून दाखवले दु:ख!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 3:46 PM

९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर कायम चर्चेत राहणारा एक चेहरा सध्या पडद्याआड आहे. हा चेहरा आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा.

ठळक मुद्दे१९८१ मध्ये  वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला.

९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर कायम चर्चेत राहणारा एक चेहरा सध्या पडद्याआड आहे. हा चेहरा आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा. म्हणायला सुधा चंद्रन यांच्याकडे मालिका आहेत. पण चित्रपटांमधून मात्र त्या कायमच्या बाद झाल्या आहेत. गत १३ वर्षांत त्यांना एकाही चित्रपटाची ऑफर आली नाही. अलीकडे एका मुलाखतीत सुधा यांनी आपले हे दु:ख बोलून दाखवले.

२००६ मध्ये प्रदर्शित ‘मालामाल वीकली’ हा सुधा चंद्रन यांचा अखेरचा चित्रपट होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता तब्बल १३ वर्षांचा काळ लोटला. या १३ वर्षांत त्यांना एकही चित्रपट ऑफर केला गेला नाही. असे का? असा प्रश्न सुधा चंद्रन यांना विचारण्यात आला. पण असे का? हे स्वत: सुधा यांनाही ठाऊक नाही.‘मालामाल वीकली’ नंतर मला एकही चित्रपट मिळाला नाही. या चित्रपटात सगळ्या पुरुषांमध्ये मी एकटी अभिनेत्री होते. प्रेक्षकांना माझे काम आवडले होते. दिग्दर्शकांनीही माझ्या कामाचे कौतुक केले होते. अनेकांना आजही वाटते की, मी स्वत: चित्रपटाच्या ऑफर नाकारल्या. पण सत्य हेच आहे की, ‘मालामाल वीकली’नंतर एकाही चित्रपटासाठी माझ्याशी संपर्क साधला गेला नाही. असे अनेक चित्रपट आहेत,ज्यातील भूमिकांना मी उत्तम न्याय देऊ शकले असते. इतके चित्रपट बनत असताना मला एकही भूमिका मिळू नये, हे माझ्यासाठी खरोखरच दुर्दैवी आहे.  निर्माते व दिग्दर्शक मला रोल का ऑफर करत नाहीत, हा प्रश्न मी अनेकदा स्वत:च स्वत:ला विचारले, असे सुधा चंद्रन या मुलाखतीत म्हणाल्या.

सुधा चंद्रन सध्या ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत काम करत आहे. त्याआधी ‘नागीन’ यर मालिकेतही त्या दिसल्या होत्या. नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण  १९८१ मध्ये  वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या.

टॅग्स :सुधा चंद्रन