नवी दिल्ली - दिल्लीतील तिहार दिल्लीच्या तिहार तुरुंगात बसून २०० कोटी रुपयांची वसुली करणारा कुख्यात ठकसेन सुकेश चंद्रशेखर आणि लीना यांच्या दीर्घ चौकशीनंतर बॉलिवूडमधील पाच मोठे कलाकार दिल्ली पोलिसांच्या रडारवर आले आहेत. दिल्ली पोलीस लवकरच त्यांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.
२०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सुकेश आणि लीना यांची चौकशी केल्यानंतर आणि त्यांच्या फोन क्रमांकांचे सीडीआर तपासल्यावर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती काही महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. तसेच सुकेश हा या बॉलिवूड कलाकारांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तपासामधून समोर आले की, २०० कोटी रुपये रूट करण्यामध्ये या बॉलिवूड कलाकारांची मदत घेण्यात आली होती. त्यामुळे याबाबत अधिक पुरावे मिळवण्यासाठी बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी बोलावणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
अॅडिशनल सी.पी. आर.के. सिंह यांनी सांगितले की, सुकेशने गुन्हेगारीच्या माध्यमातून जी काही कमाई केली, ती बॉलिवूडशी संबंधित काही लोकांना दिली गेली होती. त्यामुळे या लोकांची चौकशी होणार आहे. तसेच मुंबईमध्येही अनेक लोकांना पैसे दिले गेले. त्याबाबत अधिक माहिची घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुकेश लीनाच्या माध्यमातून बॉलिवूडमधील कलाकारांच्या संपर्कात होता. तसेच तो तुरुंगामध्ये २४ तास मोबाईलचा वापर करत असे. या कामासाठी तो तुरुंगातील अधिकाऱ्यांना दरमहा तब्बल एक कोटी रुपये द्यायचा. २०० कोटींहून अधिकच्या फसवणुकीप्रकरणी १४ लोकांविरोधात चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. तसेच हल्लीच तुरुंगातील पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले आहे.
सुकेश चंद्रशेखर हा जेव्हा १७ वर्षांचा होता तेव्हापासून तो फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. त्याच्याविरोधात २० ते २२ गुन्हे दाखल आहेत. तो आलिशान जीवन जगत असे. तसेच आपल्याला नेता बनायचे होते, असे त्याने चौकशीमध्ये सांगितले. सुरुवातीला तो लीनावर प्रेम करायचा. त्यांनी २०१९ मध्ये लीनासोबत विवाहही केला. मात्र त्यापूर्वी तो लीनासोबत दोन प्रकरणांमध्ये तो तुरुंगातही जाऊन आले होते. सुकेशची बॉलिवूडमध्ये लिंक असल्याने तसेच लीनाच्या माध्यमातून तो अनेक लोकांच्या संपर्कात होता. तसेच या प्रकरणामध्ये तुरुंगातील सर्व अधिकारीही सहभागी होते.