बॉलिवूडचा अण्णा अर्थात अभिनेता सुनील शेट्टीकडे (Suniel Shetty ) कोट्यवधीची संपत्ती आहे. पण करिअरचे म्हणाल तर अण्णाच्या वाट्याला फार काही आले नाही. अक्षय कुमार (Akshay Kumar), सलमान खान, अजय देवगणसारखे यश आणि ग्लॅमर त्याला मिळवता आले नाही. कारण काय तर अण्णाने केलेल्या चुका. अर्थात हे आमचे म्हणणे नाहीच. खुद्द सुनील शेट्टीने एका ताज्या मुलाखतीत याची कबुली दिली आहे. करिअरमध्ये मीच अनेक चुका केल्यात आणि त्याच मला नडल्या, असे तो म्हणाला.
‘बलवान’ या 1992 साली आलेल्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणा-या सुनील शेट्टीने क्रोध, सपूत, हेराफेरी, हूतूतू, भाई, धडकन, दिलवाले असे अनेक सिनेमे केले. या सिनेमाने तो अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाऊ लागला. पण याऊपर अक्षय, अजयसारखे ग्लॅमर त्याच्या वाट्याला आले नाही.
आयएनएसला दिलेल्या मुलाखतीत यामागचे कारण त्याने सांगितले. तो म्हणाला, एक सुनील शेट्टी होतो, जो काही वर्षानंतर अपयशी ठरला. कारण त्याने नेहमी सब्जेक्टवर विश्वास ठेवला. मार्केटींग त्याला कधीच जमले नाही. मी टाइपकास्ट अर्थात त्याच त्या भूमिका केल्यात, म्हणून अपयशी ठरलो असे नाही तर मी नेहमी सेफ राहण्याचा प्रयत्न केला. मी फार काही वेगळे करण्याचे धाडस केले नाही. तुम्ही जर एकाच बॅनरसोबत काम करत राहिलात तर त्याचा अर्थ होतो की तुमच्यात निर्णय घ्यायची क्षमता नाही. जर तुम्ही रिस्क घेत नाही तर तुम्ही अभिनेता नाही.
तुम्हाला स्वत:ची वेगळी स्टाइल बनवावी लागते. टायगर आणि आयुष्मान हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी रिस्क घेण्याची धमक दाखवली. आज कोणताच निर्माता सुनील शेट्टीवर 50 कोटी रुपये लावणार नाही पण अक्षय कुमारवर 500 कोटीसुद्धा लावायला सगळे तयार आहेत. एक ना अनेक चुका करिअरमध्ये मला घातक ठरल्या. अर्थात आज पश्चाताप नाही. कारण या चुकांमधून मी खूप काही शिकलोय. कदाचित मी जे काही शिकलो ते माझ्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये उपयोगी पडेल, असेही त्याने सांगितले.