सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो सुपर डान्सर मध्ये सगळेच स्पर्धक एकाहून एक दमदार परफॉर्मन्स सादर करत आहेत. शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत असून दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी या कार्यक्रमात हजेरी लावतात. या भागात प्रेक्षकांना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची परीक्षक शिल्पा शेट्टी आणि सुनील शेट्टी यांनी धडकन या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. तसेच या चित्रपटातील गाणी तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटातील सगळीच गाणी आजही रसिकांची तितकीच आवडती आहेत.
यंदाच्या भागात देखील सुपर डान्सरमधील सगळेच चिमुकले दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. हे परफॉर्मन्स पाहून सुनील देखील प्रभावित होणार आहे. तसेच सुपर डान्सरच्या या भागात शिल्पा आणि सुनील धडकन चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेच्या अनेक आठवणींना उजाळा देणार आहेत.
सुपर डान्समधील अवस्था आणि आर्यन ‘धडकन’ या चित्रपटामधील ‘दिल ने ये कहा है दिल से’ या लोकप्रिय गाण्यावर परफॉर्मन्स सादर करणार आहेत. हा परफॉर्मन्स सुनील आणि शिल्पा यांना खूपच आवडला. ते या परफॉर्मन्समुळे भूतकाळात रमले आणि त्यांनी या गाण्याशी निगडीत काही गोड आठवणींना उजाळा दिला. त्यांनी यावेळी सांगितले की, हा चित्रपट तसेच हे गाणे पूर्ण व्हायला अक्षरशः पाच वर्षं लागली होती. गाण्याचा सुरुवातीचा भाग तीन वर्ष आधी चित्रीत करण्यात आला होता आणि उरलेला त्यानंतर झाला.
धडकन या चित्रपटात शिल्पा शेट्टीला संधी दिल्याबद्दल तिने यावेळी या चित्रपटाच्या निर्मात्यांचे आभार देखील मानले. ती म्हणाली, “तो माझ्या कारकिर्दीतील वाईट काळ होता. पण धडकन या चित्रपटाचे निर्माते रतन जैन यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे.”
प्रेक्षकांना सुपर डान्सर 3 चा हा भाग शनिवार – रविवार रात्री 8 वाजता सोनीवर पाहायला मिळणार आहे.