सुनील शेट्टीचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ ला कर्नाटकमध्ये झाला. सुनील आज ५७ वर्षांचा झाला असला तरी एखाद्या तरुण नायकाला लाजवेल इतका तो फिट आहे. बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. सुनीलने बलवान या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने दिलवाले, मोहरा, गोपी किशन, रक्षक, बॉर्डर, हेरा फेरी, धडकन, फिर हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याने बिगेस्ट लूझर जितेगा या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर देखील त्याची छाप सोडली आहे.
सुनील एक अभिनेता असण्यासोबतच एक व्यवसायिक देखील आहे. त्याची अनेक हॉटेल्स आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, तो आज अनेक हॉटेल्सचा मालक असला तरी त्याचे वडील एका हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करायचे. त्यांनी त्यांच्या मेहनतीवर सुनीलला मोठे केले. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉड फादर नसताना सुनीलने बॉलिवूडमध्ये त्याचे आज प्रस्थ निर्माण केले असून तो वर्षाला केवळ एखादा चित्रपट करत असला तरी तो वर्षाला करोडो रुपये तरी कमावतो. सुनील शेट्टी सध्या इंडस्ट्रीमध्ये फारसा सक्रिय नाही. तो मोजक्याच चित्रपटांत प्रेक्षकांना बघावयास मिळतो. परंतु अशातही त्याचा व्यवसाय एवढा आहे की, वर्षाकाठी त्याची कमाई शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र आज त्याच्याकडे दिसत असलेले वैभव एवढ्या सहजासहजी प्राप्त झालेले नाही. याकरता त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. एका मुलाखतीत सुनीलने सांगितले होते की, त्याचे वडील हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करत होते. २०१३ मध्ये त्याच्या नव्या डेकोरेशन शोरूमला लॉन्च करताना त्याने म्हटले होते की, ‘ही तीच जागा आहे, ज्याठिकाणी माझे वडील वीरप्पा शेट्टी काम करायचे. माझ्या वडिलांनी वयाच्या नवव्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट करून त्यांनी १९४३ मध्ये एक बिल्डिंग खरेदी केली होती. ही बिल्डिंग वरळी येथे फोर सीजन हॉटेलच्या शेजारी आजही उभी आहे. माझ्या वडिलांचे कष्ट मी खूप जवळून बघितले आहेत. ते धान्य भरायच्या गोणीवर झोपायचे. त्यांनी आम्हाला अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला.’
आज सुनील शेट्टी कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. खंडाळा येथे त्याचे ६२०० स्केअर फुटाचे लॅव्हिश फार्म हाऊस आहे. यात एक प्रायव्हेड गार्डन, स्विमिंग पूल, लिव्हिंग रूम, पाच बेडरूम, किचन आहे. त्याचबरोबर मुंबईतील पॉश परिसरात त्याचे ‘एच २०’ नावाचे बार आणि रेस्टॉरंट आहेत. याव्यतिरिक्त साउथमध्येही त्याचे रेस्टॉरंट आहेत. तसेच सुनील शेट्टीचे स्वत:चे बुटिक आहे. सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी त्याचा हा बिझनेस सांभाळते.