अभिनेता सुनील शेट्टीने नुकताच एक भयावह किस्सा सांगितला. २००१ साली अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाला होता. 9/11 हा दिवस अमेरिकेतील प्रत्येकालाच लक्षात राहणारा आहे. त्यावेळी सुनील शेट्टी शूटसाठी अमेरिकेतच होता. त्याला चक्क लॉस एंजिलिस पोलिसांनी गुडघ्यावर बसायला सांगितलं होतं. हातात बेड्याही घातल्या होत्या. नक्की काय घडलं होतं वाचा.
चंदा कोचरच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाला, "9/11 ची घटना घडली तेव्हा मी लॉस एंजिलिसमध्ये शूटसाठी गेलो होतो. मी टीव्हीवर हल्ल्याची बातमी पाहिली. हे खरंच झालं आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. काही दिवसांनंतर आम्ही शूटिंग सुरु केलं. एक दिवस मी हॉटेलमधील रुममध्ये जात होतो. लिफ्टजवळ गेलो. तेव्हा माझी दाढी होती. मी चावीच विसरलो होतो. तिथे असलेला एक अमेरिकन माणूस माझ्याकडे एकटक बघत होता. मी त्याला विचारलं, 'तुझ्याकडे चावी आहे का? मी विसरलो आहे आणि माझा स्टाफही बाहेर आहे.' हे ऐकताच तो माणूस धावत सुटला आणि त्याने आरडाओरडा केला. पोलिस आत आले आणि त्यांनी मला गुडघ्यावर बसायला सांगितलं नाहीकर गोळी मारु असं ते म्हणाले. त्यांनी माझ्यासमोर बंदूक ताणली होती."
तो पुढे म्हणाला, "तेवढ्यात प्रोडक्शन आणि स्टाफ तिथे पोहोचला. त्यात एक हॉटेलचा मॅनेजर पाकिस्तानी होता. तो पोलिसांना म्हणाला की हा अभिनेता आहे आणि शूटसाठी आला आहे. माझ्या दाढीमुळे सगळ्यांचाच गैरसमज झाला होता."
हा किस्सा 'काँटे' सिनेमाच्या शूटवेळी घडला होता. २००२ साली सिनेमा रिलीज झाला. सुनील शेट्टीने अनेक मुलाखतींमध्ये हा किस्सा सांगितला आहे.