सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून बॉलिवूडमधील नेपोटिज्मचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावर अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी आपापली मते मांडली आहेत. आता अभिनेता सुनील शेट्टी याने यावर आपली भूमिका मांडली आहे. नेपोटिज्मवरून आपलं मत मांडत असताना सुनील शेट्टीने सांगितले की, जेव्हा त्याचा मुलगा अहान आणि मुलगी अथिया यांचं नाव यात येतं तेव्हा त्याला कसं वाटतं.
सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, नेपोटिज्म डिबेटदरम्यान अथिया किंवा अहानचं नाव आलं तर त्याला फार त्रास होतो. इतकेच नाही तर सुनील शेट्टी असंही म्हणाला की, प्रत्येक मुलाला किंवा मुलीला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार आहे. तसेच त्याने इतर पालकांना सल्ला दिलाय की, आपल्या मुलांना त्यांना जे आवडतं ते करू द्या.
सुनील शेट्टी यावेळी अथियाचा शेवटचा सिनेमा 'मोतीचूर चकनाचूर' बाबतही बोलला. तो म्हणाला की, हा फार मोठा सिनेमा नव्हता. तरी तिने हा सिनेमा केला कारण तिला तो करायचा होता. या सिनेमातील अथियाच्या कामाचं कौतुक झालं.
अथियाने भलेही इंडस्ट्रीमध्ये तीनच सिनेमे केले असतील, पण तिने तिच्या कामाने प्रेक्षकांना प्रभावित केलंय. तिने तिचं वेगळं स्थान निर्माण केलं. दुसरीकडे अहान लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तो तेलुगू अॅक्शन ड्रामा 'आरएक्स १००' च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याची हिरोईन तारा सुतारिया असणार आहे.
दरम्यान, नेपोटिज्मचा मुद्दा नेहमीच अभिनेत्री कंगनाने समोर आणला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरही कंगनानेच हा मुद्दा काढला होता. यावरून बॉलिवूडमध्ये दोन भाग झाल्याचे बघायला मिळाले. पण नंतर हा मुद्दा पुन्हा शांत झाला. पण यादरम्यान अनेकांनी आपापली मते ठामपणे मांडली होती.