90 च्या काळात बॉलिवूडवर बऱ्यापैकी अंडरवर्ल्डचं वर्चस्व होतं. त्यामुळे या काळात अनेक बॉलिवूड कलाकारांना अंडरवर्ल्डमधून धमकीचे फोन यायचे. तर, काही कलाकारांचे थेट या लोकांशी कनेक्शनही होतं. त्यामुळे 90 चा काळ बऱ्यापैकी दहशतीखाली होता. यात अनेक दिग्गज कलाकारांना अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्या होत्या. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी (suniel shetty). अलिकडेच एका मुलाखतीत सुनील शेट्टीने त्याला मिळालेल्या धमक्यांविषय़ी भाष्य केलं.
दमदार अभिनयशैली आणि फिटनेस यांच्या जोरावर सुनील शेट्टीने 90 चा काळ गाजवला होता. त्यामुळे त्याची लोकप्रियता तुफान होती. याच गोष्टीमुळे त्याला अंडरवर्ल्डमधून वेगवेगळ्या कामांसाठी फोन यायचे. इतकंच नाही तर त्याला धमकीही द्यायचे. पण, या धमक्यांना सुनीलने कधीच भीक घातली नाही.
"त्या काळात अंडरवर्ल्डचा दबदबा फारच वाढलेला होता. त्यामुळे मलाही बऱ्याचदा त्या लोकांकडून धमकीचे फोन यायचे. पण, मी त्यांना घाबरण्याऐवजी शिव्या द्यायचो. माझं हे वागणं पाहून त्यावेळी पोलीस माझ्यावर चिडले होते. तू काय करतोय तुला कळतंय का?, तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? अंडरवर्ल्डच्या लोकांना राग येईल आणि त्यामुळे ते कोणतंही पाऊल उचलतील", असं मला ते म्हणाले होते.
दरम्यान, अंडरवर्ल्डकडून केवळ सुनीललाच धमकी मिळाली नव्हती. त्याच्यापूर्वी प्रीती झिंटा, शाहरुख खान, राकेश रोशन, सलमान खान आणि महेश मांजरेकर यांनाही धमकीचे फोन आल्याचं सांगण्यात येतं.