Join us

सुनील ग्रोव्हर 'तांडव' वेबसीरिजमध्ये दिसणार वेगळ्या भूमिकेत, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 3:26 PM

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर ‘तांडव’मधून एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवर बहुप्रतिक्षित अ‍ॅमेझॉन ओरिजिनल सीरिज ‘तांडव’मधून एका नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकतेच सुनीलने ‘तांडव’बद्दल ऐकल्यानंतरची त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती, त्याच्या विनोदी व्यक्तिमत्वाहून वेगळी अशी ही व्यक्तिरेखा त्याला कशी मिळाली याबद्दल सांगितले. 

सुनील ग्रोव्हर म्हणाला की, “या सीरिजबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा ही जुनी पुराणी राजकीय कथा असेल, त्यात काहीच वेगळेपणा किंवा नवेपणा नसेल, असे मला वाटले होते. मात्र, मी जेव्हा पहिल्यांदा कथानक वाचले, तेव्हा माझा अंदाज चुकीचा होता हे लक्षात आले. तांडवचे कथानक एवढे पकड घेणारे आहे की मी यात गुंतत गेलो, संपूर्ण कथानक वाचून पूर्ण होईपर्यंत मी ते खाली ठेवू शकलो नाही. या सीरिजला अनेक पैलू आहेत. त्यामुळे मी हरखून गेलो.

तो पुढे म्हणाला, “मला वाटते मी कुठेतरी एका एकसुरी चक्रात अडकलो होतो, मला यात विशिष्ट प्रकारच्या भूमिकाच मिळत होत्या. मजेशीर किंवा विनोदी भूमिकांच्या पलीकडील कशासाठी माझा विचारच केला जात नव्हता. अली अब्बास जफर माझी निवड एका गंभीर आणि उत्कट व्यक्तिरेखेसाठी करतील असा विचारही मी कधी केला नव्हता. गुरूपालच्या व्यक्तिरेखेसाठी मी अलीची पहिली पसंती होतो हे त्याने मला सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी या व्यक्तिरेखेला न्याय देईन यावर त्याचा पूर्ण विश्वास होता.” 

गंभीर व्यक्तिरेखा साकारण्याबद्दलचा अनुभव सांगताना सुनील म्हणाला की, त्याला दिग्दर्शकाने खूप मार्गदर्शन केले. तो म्हणाला, “मला विनोदी भूमिका करण्याची सवय होऊन गेली होती. ही व्यक्तिरेखा वेगळ्या पद्धतीने करायची आहे हे अलीने मला शिकवले. रोचक अंगाने ही भूमिका साकारण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक नवीन अनुभव होता आणि मी त्याचा भरभरून आनंद लुटला.”

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांची निर्मिती असलेला ‘तांडव’ हा शो म्हणजे ९ भागांचे राजकीय नाट्य आहे. यामध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, तिग्मांशु धुलिया, दिनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तुर, मोहम्मद झिशान अयुब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनुप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागरानी यांच्या भूमिका आहेत.

टॅग्स :सुनील ग्रोव्हरसैफ अली खान