सुनील शेट्टीने बलवान या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याने दिलवाले, मोहरा, गोपी किशन, रक्षक, बॉर्डर, हेरा फेरी, धडकन, फिर हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक स्थान निर्माण केले आहे. त्याने बिगेस्ट लूझर जितेगा या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर देखील त्याची छाप सोडली आहे.
सुनील शेट्टी आणि मानाची लव्हस्टोरी एक पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती. येथे सुनीलने पहिल्यांदा मानाला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मानाच्या जवळ जाण्यासाठी सुनीलने सर्वप्रथम मानाच्या बहिणीला मैत्रीण बनवले. मानाच्या बहिणीने दोघांची भेट घालून दिली आणि सुनीलने अगदी फिल्मी स्टाइलने मानाला प्रपोज केले होते. मानानेसुध्दा लगेच होकार दिला. सुनील शेट्टीची पत्नी माना मुस्लिम असून तिचे खरे नाव माना कादरी आहे. दोघांनी 9 वर्षे एकमेंकांना डेट केले. 1991मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना मुलगी अथिया आणि मुलगा अहान आहेत.
बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंत स्टार्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. सुनीलने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या कमाईत त्याची पत्नी माना शेट्टी हिचाही मोठा हात आहे. एक यशस्वी उद्योजिका आणि यशस्वी सामाजिक कार्यकर्ता अशी तिची ओळख आहे.