अभिनेत्री सुनीता रजवार य़ांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली आहे. सध्या त्या वेब शो 'गुलक 4' मध्ये दिसत आहेत. पंचायतमधील त्यांच्या भुमिकेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुनीता यांनी आता त्यांच्या यशाबद्दल आणि अभिनय कारकिर्दीबद्दल सांगितलं आहे. लोकप्रियता त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचं सांगितलं आहे. तसेच आजही अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झालं आहे का? असा प्रश्न त्यांना पडतो.
सुनीता या एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांच्या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाही. सुनीता यांनी आपल्या कामामुळे लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या पालकांना त्यांचा अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय आवडला नाही. पण सुनीता यांनी त्यांना समजावलं. "मी एका लोअर मीडलक्लास कुटुंबातून आले आहे. माझे वडील ट्रक चालक होते. आई घर सांभाळायची."
"दोघांचंही शिक्षण फारस झालेलं नव्हतं पण दोघांचेही विचार फार मोठे होते. मी नॉर्मल विद्यार्थी होते. अशा परिस्थितीत मी हिंदी मीडियममध्ये शिकण्याचा निर्णय घेतला. मला सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये, मी एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले."
"मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाबद्दल माहिती मिळाली. मी कल्पनाही करू शकत नव्हते की मी अभिनयातून पैसे कमवू शकेन. कॅमेऱ्यासमोर येणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मला फक्त स्टेजवर अभिनय करायचा होता. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला."
"माझ्यासाठी इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी भरपूर नोकऱ्या केल्या आणि पैसे कमावले. मी खूप संघर्ष केला. 'पंचायत' आणि 'गुलक' नंतर मला काही चांगल्या भूमिका मिळायला लागल्या. नाहीतर तोपर्यंत मी फक्त मोलकरणीचीच भूमिका करताना दिसले" असं सुनीता रजवार य़ांनी म्हटलं आहे.