करिश्मा कपूरने केवळ १७ व्या वर्षी प्रेम कैदी या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातील करिश्माच्या अभिनयाला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळाली नव्हती. त्यानंतर तिने पोलिस ऑफिसर, जागृती असे अनेक फ्लॉप चित्रपट दिले. पण जीगर या चित्रपटानंतर तिच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने राजा बाबू, अंदाज अपना अपना, कुली नं १, राजा हिंदुस्तानी, जुडवा, दिल तो पागल है, बिवी नं १ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या.
करिश्मा तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचे लग्न संजय कपूरसोबत झाले होते. त्या दोघांना दोन मुले देखील आहेत. 2012 मध्ये करिश्मा आणि संजयचे लग्न झाले. पण लग्नाच्या काहीच महिन्यात त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि 2014 मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. करिश्मा बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या झोतात असताना तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण संजय तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. पण संजयने त्यांची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यात त्याने म्हटले होते की, करिश्माने केवळ पैशांसाठी त्याच्यासोबत लग्न केले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, संजयने त्याचे आणि करिश्माचे लग्न मोडण्यामागे केवळ करिश्माच जबाबदार असल्याचे देखील म्हटले होते. एवढेच नव्हे तर अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा मोडल्यानंतर तिला प्रचंड शॉक बसला होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने माझ्यासोबत लग्न केले असा देखील आरोप त्याने केला होता.
पण करिश्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी किती खर्च करते याकडे संजयचे लक्ष असायचे. त्याने गिफ्ट दिलेला ड्रेस मी घातला नसल्याने त्याने त्याच्या आईला मला मारायला सांगितले होते. मी केवळ एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने त्याने माझ्यासोबत लग्न केले होते. संजय मला अनेकवेळा मारायचा. मी मेकअप करून त्या खुणा लपवायचे. पण सगळ्या गोष्टी असाहाय्य होत असल्याने मी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.