सनी देओल (Sunny Deol) सध्या 'गदर 2' च्या यशाचा उपभोग घेतोय. सिनेमाने आतापर्यंत 450 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे सिनेमाच्या यशात मग्न असताना सनी देओलने कर्ज न भरल्यामुळे बँकेने त्याचा जुहू येथील स्टुडिओ लिलावात काढण्याची घोषणा केली होती. नंतर बँकेने निर्णय मागे घेतला. मात्र आता सनी देओल पुन्हा एकदा पैशांच्या कारणाने चर्चेत आहे. एका प्रसिद्ध निर्मात्याचे तब्बल २ कोटी रुपये थकवल्याचा आरोप सनी देओलवर केला आहे.
हे प्रकरण २७ वर्ष जुने आहे. 'जानवर','अंदाज' सारखे सिनेमे करणारे निर्माते सुनील दर्शन (Suneel Darshan) २७ वर्षांपासून सनी देओलविरोधात कायदेशीर लढाई लढत आहे. दैनिक भास्करशी संवाद साधताना सुनील दर्शन म्हणाले, 'ही गोष्ट १९९६ ची आहे. सनी देओल एक इंटरनॅशनल फिल्म डिस्ट्रिब्युशन कंपनी सुरु करणार होता. मी यामध्ये त्याची मदत केली होती. आज इतकी वर्ष झाली त्याने माझे पैसे परत केले नाहीत. दरम्यानच्या काळात त्याने स्वत:ची मालमत्ता वाढवली पण माझे पैसे द्यायला विसरला.'
ते पुढे म्हणाले, 'तेव्हा सनी 'अजय' फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. स्वत:च्या वाढदिवशी त्याने मला कंपनी सुरु करण्यासाठी आग्रह धरला होता. त्याने माझ्याकडे अजय साठी ओव्हरसीज डिस्ट्रिब्युशन राईट्स मागितले. याचे पूर्ण पेमेंट करणार असं तो म्हणाला होता. त्याने पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी लंडनला जात असल्याचं सांगितलं. मी त्याच्यावर विश्वास ठेवून सह्या केल्या. नंतर कित्येक महिने मी पाठपुरावा केला. पण तो कायम टाळत होता. शेवटी मी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत मी कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहे. माझे एकूण १ कोटी ७७ लाख रुपये सनी देओलने थकवले आहेत.'