ठळक मुद्दे‘गदर’ हा चित्रपट अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता.
सनी देओल, अमीषा पटेल यांच्या करिअरमधील सर्वाधिक ब्लॉकबस्टर सिनेमा कुठला तर तो म्हणजे ‘गदर’. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: धूम केली. १७ कोटी रूपयांत बनून तयार झालेल्या या चित्रपटाने २५६ कोटी रूपयांची अभूतपूर्व कमाई केली. ‘गदर’ने प्रेक्षकांना असे काही वेड लावले होते की, सनी पाजीचा हा चित्रपट पाहण्यासाठी टॅक्टर-ट्रॉलीमधून लोकांचे जत्थेच्या जत्थे चित्रपटगृहांत येत. आम्हाला हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे, या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा येऊ घातलेला सीक्वल.
होय, ताजी बातमी खरी मानाल तर, ‘गदर’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरु केली आहे. या सीक्वलशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत १५ वर्षांपासून ‘गदर’च्या सीक्वलवर काम सुरु होते. या सीक्वलमध्येही तारा (सनी देओल), सखीना (अमीषा पटेल) आणि जीतची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अर्थात यात ‘गदर’ची पुढची कथा दाखवली जाईल. ही कथा भारत-पाक संबंधाच्या पार्श्वभूमीवरच पुढे रेटली जाईल. बाहुबली, रेम्बो, फास्ट अॅण्ड फ्युरिअस या चित्रपटांची कथा ज्या पद्धतीने पुढे नेली अगदी त्याचपद्धतीने ‘गदर’ची कथा पुढे नेली जाईल. सूत्रांचे मानाल तर, मेकर्सनी यासंदर्भात सनी देओलशी चर्चा केली आहे. या सीक्वलबद्दल आणखी काही सांगण्यास सूत्रांनी नकार दिला. पण सीक्वल येणार, यावर मात्र शिक्कामोर्तब केले.
‘गदर’ हा चित्रपट अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केला होता. अनिल शर्मा देओल कुटुंबाच्या निकटचे मानले जातात. त्यांनी देओल कुटुंबासोबत अनेक चित्रपट बनवले आहेत आणि सनी देओलसोबतचे त्यांचे चित्रपट कायम हिट राहिले. अर्थात अनिल शर्मा यांचे अलीकडचे चित्रपट दणकून आपटले. त्यामुळे ‘गदर’च्या सीक्वलच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.